मुंबई-
मुंबईतील बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली तुम्ही दिलीत आणि आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता. मग तुम्हाला बापाचे विचार विकणारी टोळी म्हणायचं का? असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा सडेतोड समाचार घेतला. तसंच आज इतका विराट जनसागर इथं का लोटला याचं आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करायला हवं असंही ते म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी अस्तित्वात येत असताना मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेचाही किस्सा सांगितला.
बापाचे विचार विकले, मग तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
"शरद पवारांनी उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल असं तुम्हाला सांगितलं. तुम्ही मला तेच सांगितलं. याच इथल्या सोफीटेल हॉटेलमध्ये मला बोललात की पवार साहेब मला मुख्यमंत्री व्हावं असं सांगत आहेत. त्यावेळी माझ्या जागी दुसरा कुणी असता तर तो हार्टअटॅकनं गेला असता. पण या एकनाथ शिंदेला पदाची लालसा नाही. मी तुम्हाला हो मग काय अडचण आहे असं क्षणार्धात म्हटलं होतं. पण आज तोच एकनाथ शिंदे तुमच्यासमोर उभा आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
'50 आमदार-18 खासदार, जनतेने आम्हाला पाठिंबा का दिला? याचे आत्मपरीक्षण करा'
तुम्ही 'वर्क फ्रॉम होम'वाले आम्ही 'वर्क विदआऊट होम'वाले"कोरोना काळात तुम्ही वर्क फ्रॉम होम केलं. पण आम्ही वर्क विदआऊट होमवाले आहोत. एकनाथ शिंदे जागोजागी जाऊन सर्वांची विचारपूस करत होता. रुग्णालयातील अडचणी सोडवत होता. महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात अडकली होती. प्रवासी खाली उतरायला मागत नव्हते. किती पाणी खोल याची भीती सर्वांना होती. पण मी अजिबात पर्वा न करता पाण्यात उतरलो. एक गर्भवती महिला तिथं अडकली होती. तिथं डॉक्टरांना घेऊन गेलो", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?बाप चोरला बाप चोरला असं तुम्ही वारंवार म्हणता पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही बापालाच विकण्याचा विचार केलात. मग आम्ही तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. "आम्हाला शिवतीर्थवर परवानगी मिळाली नाही तरी आजच्या गर्दीनं खरी शिवसेना कुठं आहे सिद्ध झालं आहे. या विराट सभेला उपस्थित राहणाऱ्या जनतेसमोर मी नतमस्तक मी झालो. कारण आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आला आहात. काल रात्रीपासूनच तुम्ही इथं आलात. कारण बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन जात आहोत. सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी मूठमाती दिली. मी आज सांगतो. शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही. शिवसेना एकनाथ शिंदेंची देखील नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि वारसा विचारांचा असतो. सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचं. बाळासाहेबांचे वारसदार हे विचारांचे वारसदार. वारसा विचारांचा असतो तो जपायचा असतो", असं एकनाथ शिंदे म्हणाले.