"...तेव्हा मी आमदारांची बाजू न घेता IAS अधिकाऱ्याची बाजू घेतली, असं हे राजकारण"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 07:44 PM2023-08-31T19:44:44+5:302023-08-31T19:45:54+5:30
मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा राजकारणाकडे बघण्याची माझी नजर प्रदुषित नव्हती.
मुंबई - राज्याच्या राजकारणात गेल्या ४ वर्षात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे, कुटुंबातील नात्यांमध्येही या राजकीय बदलाचा परिणाम जाणवतो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपासोबत सत्तेत सहभागी झाल्याने राजकारणात वेगळीच रंगत आली आहे. त्यातच, दोन महिने सुट्टीवर गेलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रीय झाल्या असून शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दौऱ्यालाही सुरुवात केलीय. त्यानंतर, पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी आपण अपघाताने राजकारणात आल्याचं म्हटलं.
राखी पौर्णिमेला दरवर्षी मुंडे घराण्यातील बहिण-भावाची चर्चा होत असते. राजकारणात एकमेकांचे विरोधक असणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले. पंकजा यांनी धनंजय मुंडेंना राखी बांधली. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राजकीय प्रवेशाबद्दल भाष्य केलं. राजकारण सोडून द्यावं, असं सारखं वाटतं. कारण, मी अपघाताने राजकारणात आले. माझ्या विधानसभा उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मला ते माहिती झालं, तोपर्यंत मी निवडणुकीला उभारणार असल्याचंही मला माहिती नव्हतं. मात्र, दुर्दैवाने माझे वडिल ३ जून २०१४ साली गेले आणि मी राजकारणात फेकले गेले, असे पंकजा यांनी म्हटले.
मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा राजकारणाकडे बघण्याची माझी नजर प्रदुषित नव्हती. मात्र, जेव्हा राजकारणातील प्रदुषण मी जवळून पाहिलं, एकटीने ते हाताळलं, फेस केलं, अडखळले, पडले आणि जिंकले. त्यावेळी, मला कळालं की राजकारणात एक रिबेलपणा पाहिजे, आय डोन्ट केअर हा अॅटीट्यूट पाहिजे तो माझ्यामध्ये नाही. मी जेव्हा मंत्री होते तेव्हा एका आयएएस अधिकाऱ्यावर चुकीच्या पद्धतीने अत्याचार आमदारांनी केला होता. तेव्हा माझ्यापुढे अशी परिस्थिती आली होती की मला राजकीयदृष्ट्या आमदारांची बाजू घ्यावी लागेल. पण, मी नाही घेतली, आमदारांना नाराज केलं. मी महिला आयएएस अधिकाऱ्याची बाजू घेतली, असा किस्सा पंकजा मुंडेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितला.