मुंबई - भाजपाचे पूर्वीश्रमीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षात आपल्याला वारंवार झालेल्या अपमानबद्दल खुलासा केला. आजपर्यंत आपण भाजप पक्षावर कधीही टीका केली नाही. कारण, जो पक्ष मी वाढवला त्या पक्षाला नालायक म्हणणं, या मानसिकतेचा मी नाही. पण, पक्षातील काही लोकांमुळे मला भाजपा सोडावी लागली, असे म्हणत नाथाभाऊंनी पक्षात झालेल्या अपमानाचा खुलासाच केला. विशेष म्हणजे मला अशाप्रकारे अपमानित केलं जायचं, ज्यामुळे मेल्यासारखंच वाटायचं, असे खंत त्यांनी बोलून दाखवली.
एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत भाजपा पक्ष सोडण्यासाठी काही लोकं कारणीभूत होती, त्यांच्यामुळेच मी भाजपा सोडल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. विशेष म्हणजे पक्ष सोडण्याची इच्छा नाही, असे मी अनेकदा जाहीर भाषणातून बोलून दाखवलं होतं, असेही त्यांनी म्हटले.
''मला भाजपचा कधी द्वेषही नव्हता, किंवा आजपर्यंत मी भाजपावर कधीच आरोप केले नाहीत. मी जो पक्ष वाढवला त्या पक्षाला नालायक म्हणा, अशी माझी मानसिकता कधीच होणार नाही. पण, काही व्यक्तींविषयी माझा आक्षेप होता. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे छोटे-मोठे अनुयायी, गिरीश महाजन यांच्यासारख्यांनी मला टार्गेटेड करुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच मला भाजपमधून वेगळं व्हावं लागलं,'' अशी खंत आमदार एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली.
भाजपात असताना मला कोअर कमिटीतून बाहेर काढलं, मुख्य समितीतून बाहेर काढलं, निवड समितीतून बाहेर काढलं. बैठकांना जाणीवपूर्वक मी तिथं असताना मला सांगितलं जायचं की, तुम्हाला बैठकांना आमंत्रण नाही, हे सांगणं म्हणजे मला तर मेल्यासारखं व्हायचं, हे सांगून एकनाथ खडसेंनी भाजपात सर्वाधिक अपमानित कसं केलं गेलं, याचा खुलासाच केला. तसेच, हे सर्वजण मला गुरू मानायचे, माझ्याजवळ राहायचे ते मला म्हणायचे की तुम्हाला या बैठकीचं निमंत्रण नाही. म्हणज जाणीवपूर्वक अपमान करायचा आणि मी बाहेर निघावं अशी परिस्थिती निर्माण करायची.
मी अनेकदा भाषणांतूनही सांगायचो की माझा वारंवार अपमान होतोय, पण भाजपा सोडावं असं मला वाटत नाही. पण, शेवटी मी माणूस आहे, मला टोकाचं छळलं गेलं, तेव्हा मी पक्षातून बाहेर पडलो, असेही खडसेंनी म्हटलं. दरम्यान, मला केवळ आरोपांमुळे काढून टाकता आणि सगळे आरोपवाले पक्षात घेता, ही कुठली निती आणि कुठली नितीमत्ता आहे, असा खोचक टोमणाही भाजपच्या नेत्यांना खडसेंनी लगावला.