मुंबईतील भाजपाचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ असलेल्या उत्तर मुंबईमधून भाजपाने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, पीयूष गोयल यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनोद घोसाळकर यांनी दंड थोपटले आहेत. पीयूष गोयल हे उत्तर मुंबईमधून जिंकणारच नाहीत, मातोश्रीतून आदेश आला तर मी उत्तर मुंबईतून लढेन आणि जिंकेन, असा दावा विनोद घोसाळकर यांनी केला आहे.
विनोद घोसाळकर म्हणाले की, गेल्या तीन चार दिवसांपासून प्रसारमाध्यमांमधून उत्तर मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून माझं नाव पुढे केलं जातं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीतून इकडून लढा, तिकडून लढा, असा आदेश आल्यावर मी जय पराजयाचा हिशोब केला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मला उत्तर मुंबईमधून लढा, असा आदेश दिला तर मी १०० टक्के उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवेन आणि जिंकेन, असे विनोद घोसाळकर म्हणाले.
यावेळी पीयूष गोयल यांच्यावर बाहेरील उमेदवार म्हणून होत असलेल्या आरोपांवरून टोला लगावताना विनोद घोसाळकर म्हणाले की, पीयूष गोयल हे उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूक जिंकणारच नाही आहेत. दुसरं असं आहे की बोरिवली विधानसभा मतदारसंघातील जनता, उत्तर मुंबईतील जनता यांची तक्रार आहे की, भाजपाने या भागावर सातत्याने अन्याय केला आहे. इथे पहिल्यांदा रामभाऊ आले, ते कुठून आले गोरेगावमधून, गोपाळ शेट्टी हे स्थानिक होते. नंतर सुनील राणे आले आणि आता पीयूष गोयल. बोरिवलीकरांना किंवा उत्तर मुंबईतील लोकांना तुम्ही गृहित धरता त्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये राग आहे. काल परवा बोरिवलीतील काही मतदारांनी बाहेरील उमेदवाराला मदत करणार नाही अशी भूमिका घेतली होती. आता बोरिवलीतूनच विरोधाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पीयूष गोयल किती मोठे आहेत, त्यांची किती उंची आहे, यापेक्षा माझी उंची, माझं काम, माझी निष्ठा कामी येईल, असा दावा विनोद घोसाळकर यांनी केला.