...तर मी पुन्हा अयोध्येत जाईन, उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 09:14 AM2019-04-02T09:14:40+5:302019-04-02T09:15:50+5:30

भाजपासोबत युती झाल्यानंतर या विषयाला ब्रेक लागेल असं वाटलं असेल तर तसं होणार नाही राममंदिराच्या उभारणीला गती मिळाली नाही तर मी पुन्हा अयोध्येत जाईन असा विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.

... Then I will go to Ayodhya again says Uddhav Thackeray | ...तर मी पुन्हा अयोध्येत जाईन, उद्धव ठाकरेंचा इशारा

...तर मी पुन्हा अयोध्येत जाईन, उद्धव ठाकरेंचा इशारा

Next

मुंबई -  शिवसेना अयोध्येत गेल्यानंतर थंड बस्त्यात पडलेला राममंदिराचा मुद्दा हलायला लागला. त्याच्यावर पुन्हा देशभर एक वादळ निर्माण व्हायला लागलं. कोर्टालासुद्धा काही निर्णय, किंबहुना काही पावले उचलावी लागली. त्यानंतर एक मोठा निर्णय याबाबतीत झाला की, ती विवादास्पद जमीन सोडून बाकीची जमीन पुन्हा त्या ट्रस्टकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपासोबत युती झाल्यानंतर या विषयाला ब्रेक लागेल असं वाटलं असेल तर तसं होणार नाही राममंदिराच्या उभारणीला गती मिळाली नाही तर मी पुन्हा अयोध्येत जाईन असा विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.

जनतेच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांबद्दल प्रचंड आस्था आहे, ती संपूर्ण देशात आहे. आणि मंदिर व्हावं ही संपूर्ण देशाची इच्छा आहे हे वातावरण मी अयोध्येत जाऊन बघितलं आहे. त्यामुळे अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने मध्यस्थ नेमले आहेत पण या सगळ्याला कालमर्यादा घातली पाहिजे. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

आम्ही दगा करणार नाही, तुम्ही दगा करु नका

तसेच आम्ही दोघांनी ‘युती’ म्हणून देशात संघर्ष केला आहे. काय वातावरण होतं तेव्हा देशात? हिंदू म्हणवून घेणं हा गुन्हा होता. हिंदुत्व ही शिवी होती. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद असा उल्लेख सुरू झाला होता. या देशातील हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ते दिवस आले. मग आता समज-गैरसमज दूर केले नाहीत तर दोघांचे नुकसान ठरेल. दैव देते आणि कर्म नेते अशी आपली स्थिती होईल. आपण कर्मदरिद्री ठरू त्यामुळे हे नातं टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा हवा. आम्ही दगा देणार नाही, आम्हाला दगा देऊ नका असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला केले. 

शिवसैनिकांना लाचार होऊ देणार नाही

शिवसैनिकांवर माझा ठाम विश्वास आहे, हे माझं कर्तृत्व अजिबात नाही. केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून माझ्यावर त्यांचं प्रेम आहे. आणि त्यांना खात्री आहे की, मी जो निर्णय घेईन तो सर्वांच्या हिताचाच असेल आणि त्याच्यामुळे त्यांना लढ म्हटलं तर ते हिरीरीने लढतील आणि दोस्ती कर म्हटलं तर ते अत्यंत जिवाभावाची दोस्ती करतील. त्यांना माहितीये की, हा बाळासाहेबांचा मुलगा आपल्याला दगाफटका नाही करणार आणि मी कधी शिवसैनिकाला लाचार होऊ देणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

Web Title: ... Then I will go to Ayodhya again says Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.