Join us

...तर मी माझ्या नावाचं पत्र परत घेतो; विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांचं सत्ताधाऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 10:35 IST

मी कधीही पदाची लालसा ठेवली नाही, पद म्हणजे माझा परमेश्वर नाही, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

Shiv Sena Bhaskar Jadhav: पुरेशा संख्याबळाअभावी यंदा विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. महाविकास आघाडीतून काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची या पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. मात्र या पत्रावर विधानसभा अध्यक्षांनी अजूनही कार्यवाही केलेली नाही. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काल सभागृहात भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका मांडत सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना यासंबंधीचा निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, "विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल तर आज या महाराष्ट्रासमोर सभागृहात मी खुलेआमपणे सांगतो की, खरंच तुम्हाला अडचण असेल तर मी माझ्या नावाचं पत्र मागे घेतो. माझ्या पक्षप्रमुखांकडून आणि महाविकास आघाडीकडून दुसऱ्या कोणाच्या तरी नावाचं पत्र देतो, पण विरोधी पक्षच नको, अशी भावना ठेवू नका," अशी भूमिका आमदार जाधव यांनी मांडली. 

दरम्यान, "माझ्या आयुष्यात मी कधीही पदाची लालसा ठेवली नाही, पद म्हणजे माझा परमेश्वर नाही," असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

नाराजीनंतर पक्षनेतृत्वाने घेतली दखल भास्कर जाधव हे शिवसेना ठाकरे गटामधील ज्येष्ठ आमदार असून, १९९५ मध्ये ते शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपदही सांभाळलं होतं. पुढे २०१९ मध्ये भास्कर जाधव हे पुन्हा शिवसेनेत परतले होते. तसेच २०१९ मध्ये शिवसेनेकडून आणि २०२४ मध्ये ठाकरे गटाकडून ते विधानसभेवर निवडून आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार जाधव हे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आपली क्षमता असूनही आपल्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही, असे बोलून आमदार जाधव यांनीही आपली नाराजी मांडली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आमदार भास्कर जाधव यांच्या रूपाने कोकणात एकमेव जागेवर यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्याकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. 

टॅग्स :भास्कर जाधवशिवसेनाउद्धव ठाकरेमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष