...तर बेमुदत संपाचा इशारा
By admin | Published: October 14, 2015 03:55 AM2015-10-14T03:55:34+5:302015-10-14T03:55:34+5:30
बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळाले नाही, तर २५ आॅक्टोबरच्या रात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बेस्ट कामगार कर्मचारी कृती समितीने दिला आहे.
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळाले नाही, तर २५ आॅक्टोबरच्या रात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बेस्ट कामगार कर्मचारी कृती समितीने दिला आहे. कृती समितीचे निमंत्रक के.एस. अहिरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत बेस्ट प्रशासनाला इशारा दिला. या वेळी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पाच प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून कॅनेडियन वेळापत्रकामुळे बेस्ट कर्मचारी मेटाकुटीला आल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. राव म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे बेस्ट प्रशासनाला ६७ कोटींचा फायदा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना २० टक्के सानुग्रह अनुदान द्यायलाच हवे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या नव्या वेळापत्रकामुळे १४ ते १६ तासांची ड्युटी कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. पुरेसा आराम मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण होत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठविण्याच्या विचारात असलेल्या बेस्ट प्रशासनाचा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी विरोध केला. ते म्हणाले, वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी वेतन करारात होणारी तुटपुंजी वाढ कमी पडत आहे. परिणामी, महागाई भत्ता गोठवल्यास कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळेल. त्यामुळे कामगारांमध्ये उद्रेक होऊन ते स्वत: संपात उतरण्याच्या तयारीत आहेत.
२५ आॅक्टोबरला डिलाईल रोड येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानात कृती समितीने जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
या सभेत बेस्ट कामगार सेना, बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट इलेक्ट्रीक युनियन आणि एससी एसटी एम्प्लॉईज युनियनचे कामगार व पदाधिकारी सामील होतील.
तोपर्यंत बेस्ट प्रशासनाने कृती समितीच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर संपाची घोषणा होईल. आणि सभेच्या रात्रीपासून बेस्टचे सर्व वाहक, चालक आणि कामगार संपामध्ये उतरतील, अशी माहिती अहिरे यांनी दिली.
संपाची धुरा
निवृत्त कर्मचाऱ्यांकडे
पाचही महत्त्वाच्या संघटनांनी संपाची धुरा निवृत्त कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या कृती समितीकडे सोपवली आहे. आपल्यावर झालेला अन्याय सध्या कार्यरत असलेल्या कामगारांवर होऊ नये, म्हणून पुढाकार घेतल्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले.