मुंबई - प्रहार संघटनेचे प्रमुख आणि शिंदे गटासोबत असलेले आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावर भाष्य करताना भूमिका स्पष्ट केली. शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे आजारपण हे अजित पवारांच्या सत्तेत आल्याने झालेलं दु:खणं असल्याचं शिवसेना उबाठा गटाने म्हटलं आहे. त्यासंदर्भात आमदार बच्चू कडूंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, तसं काहीही नाही. मुख्यमंत्री खरंच आजारी आहेत, म्हणून ते गावी गेलेत, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
पुण्यात राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांची महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाल्याचं शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हटलं आहे. या चर्चेनंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले, ते गावी गेले असे शिवसेनेनं म्हटलं आहे. त्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना बच्चू कडू यांनी कडक शब्दात भूमिका मांडली. ते बिलकुल खोटं आहे, आम्ही त्यांच्या भेटीला गेलो असता त्यांचा ताप १०३ पर्यंत गेला होता. सातत्याने काम करत असल्याने धावपळ आणि दगदगीतून हे आजारपण आलं असावं. नेतृत्त्व बदलासाठी आजारपण घेण्याची गरज नाही, असे आमदार कडू यांनी स्पष्ट केले.
तसेच, मला ठाम विश्वास आहे, २०२४ पर्यंत कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. आणि जर तो बदल झाला तर महागात पडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत बच्चू कडू यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे. सत्तेतील भाजपा आणि राष्ट्रवादीलाच हा इशारा दिलाय.
राष्ट्रवादीतील फुटीवरही केलं भाष्य
एकंदरीत चित्र पाहिले तर राष्ट्रवादी पक्षच संभ्रमात आहे. अजित पवार फुटल्यानंतर जो विरोध व्हायला पाहिजे तसा झाला नाही. शरद पवारांचे सगळीकडे फोटो आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यासारखेच आहे. कदाचित शरद पवार हे सुद्धा अजित पवारांसोबत येऊन महायुती आणखी मजबूत करतील असा दावाही बच्चू कडू यांनी केला. शरद पवारांचे बोलणे आणि प्रत्यक्षात कृती या न समजणाऱ्या गोष्टी आहेत. शरद पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते बोलत नाहीत असा त्यांचा राजकीय कारकिर्दीतला अनुभव आहे. राष्ट्रवादीत सध्या कुठेही फूट नाही. एक दिसणारा गट तर एक न दिसणारा गट आहे.