Join us  

...तर मनावर दगड ठेवण्याची वेळच आली नसती, उद्धव ठाकरेंच्या भाजपला कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:01 AM

उद्धव ठाकरे यांच्या भाजपला कानपिचक्या

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘आमच्याबरोबर मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचे ठरवले होते, ते पाळले असते तर आज मनावर दगड ठेवायची वेळ आली नसती; उलट अडीच वर्षे तुमच्या दगडाला शेंदूर लागला असता,’ अशा कानपिचक्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला दिल्या. येथील अभ्युदयनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून भाजपला सुनावले. 

तेव्हा सन्मानाने तुम्हालाही अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाले असते, असे सांगून त्यांनी भाजपने शब्दच मोडला नाही तर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला कमी जागा दिल्या व आमचे उमेदवार पाडण्यासाठी बंडखोरी घडवून आणली, असा आरोपदेखील केला. एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल करताना ठाकरे म्हणाले की, सामान्यांमधून आम्ही असामान्य नेते घडविले, ते निघून गेले. पुन्हा सामान्यांमधून असामान्य घडवू. यापूर्वी शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले, आता शिवसेना संपविण्याचा डाव आहे. ते ठाकरे व शिवसेना नाते तोडायला निघाले आहेत, पण त्यांच्या तीन पिढ्यांनाही ते जमणार नाही, असा इशारा उद्धव यांनी दिला.  तुम्ही नमकहराम आहात. एवढीच मर्दुमकी असेल तर माझ्या वडिलांचा फोटो लावत फिरू नका, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. तुम्ही माझ्या वाढदिवसाला प्रतिज्ञापत्रांची भेट द्या, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, खा. अरविंद सावंत, आ. अजय चौधरी, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा