मुंबई - सकल मराठा समाजाकडून राज्य सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे. दोन दिवसात मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास 1 ऑगस्टला जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत आज सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारला हा इशारा देण्यात आला आहे. सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत चालढकल करण्यात येत असल्याने मराठा समाज आक्रमक बनला आहे.
मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून मुंबईसह ठाणे व इतर ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे सकल मराठा महामुंबईकडून सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटल यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशीही मागणी या महामुंबईतील बैठकीत करण्यात आली. तर पुढील 2 दिवसांत या मागण्या मान्य न झाल्यास 1 आॉगस्टला जेलभरो करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
राज्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोनाची धग वाढताना दिसत आहे. त्यात, राजकीय नेत्यांकडून होणारी वक्तव्ये ही या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच अद्यापही राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. तर महामुंबईतील सकल मराठा समाजाकडूनही सरकारवर टीका होत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज दुपारी विधानसभेत सर्वपक्षीय विरोधी नेत्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.