…तर मुंबई पोलिसांकडून घेतलेले संरक्षण सोडा, अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं खरमरीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:46 PM2020-08-03T17:46:55+5:302020-08-03T18:12:20+5:30
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्यानंतर आता या टीकेला शिवसेनेकडून खरमरीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारण पेटले असून, राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधा पक्षात असलेला भाजपा यावरून आमने-सामने आलेले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्यानंतर आता या टीकेला शिवसेनेकडून खरमरीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा ज्या तऱ्हेने तपास सुरू आहे, त्यावरून मुंबईने माणुसकी गमावलीय असं मला वाटत आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली होती. त्याला शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर देणाऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांचे संरक्षण घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता? मग मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर सोडून द्या की त्यांच्याकडून घेतलेले संरक्षण. याच मुंबई पोलिसांच्या उमंग कार्यक्रमात गायलात. किती कृतघ्न होणार, असा जळजळीत सवाल वरुण सरदेसाई यांनी विचारला आहे.
मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता??
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 3, 2020
सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !! https://t.co/ITw8AKLN0P
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र अधिक तपास करण्यासाठी बिहार पोलीसही मुंबईत दाखल झाले आहेत. बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत क्वारंटाईन केल्यानंतर या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे.