‘...तर बिबट्या घरात मुक्कामाला येईल!’
By Admin | Published: July 8, 2017 06:14 AM2017-07-08T06:14:21+5:302017-07-08T06:14:21+5:30
मुंबईलगतच्या परिसरांत सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे भविष्यात बिबट्या घरात मुक्कामाला आला, तर नवल वाटायला नको, अशा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईलगतच्या परिसरांत सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे भविष्यात बिबट्या घरात मुक्कामाला आला, तर नवल वाटायला नको, अशा शब्दांत ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांनी खंत व्यक्त केली आहे. कामगार कल्याण मंडळाच्या वनमहोत्सवाचा शुक्रवारी नायगाव ललित कला भवनमध्ये समारोप कार्यक्रम पार पडला, या वेळी माटल बोलत होते.
माटल म्हणाले की, विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल होणार हे निश्चित आहे. मात्र, वृक्षसंपदा नव्याने उभी करण्याच्या दृष्टीने म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे मुंबईची वनसंपदा नव्याने निर्माण करण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीने आणि शासकीय कर्मचाऱ्याने किमान एक वृक्ष लावून, त्याचे संवर्धन करण्याची सक्ती सरकारने करायला हवी, नाहीतर जंगले नष्ट होऊन पर्यावरणाचा ऱ्हास अटळ आहे.
कामगार कल्याण मंडळाच्या ६४व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत, मंडळाने अंधेरीसह नायगाव, वरळी परिसरांत वनमहोत्सवांतर्गत वृक्षलागवडीचे आयोजन केले होते. वनमहोत्सवाच्या सांगताप्रसंगी कल्याण आयुक्त सतीश दाभाडे, सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड, कल्याण अधीक्षक संजय मोहिते उपस्थित होते. नाट्यलेखक व अभिनेते राघवकुमार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.