LockDown in Mumbai: ...तर मुंबईत लॉकडाऊन! मुंबईच्या महापौरांनी केले सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:47 AM2022-01-05T07:47:12+5:302022-01-05T07:47:30+5:30
Mumbai corona Virus:
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येने २० हजारांचा आकडा ओलांडला तर मात्र केंद्राने घालून दिलेल्या नियमांनुसार, राज्य सरकार आणि महापालिका नियमांची पूर्तता करेल, असे सूचक वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त करत मुंबईकरांना लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र जर का आपण नियम पाळले तर याची गरजच भासणार नाही, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतील क्वारंटाईन सेंटर असो किंवा रुग्णालय, होम क्वारंटाईन या सगळ्याकडे मुंबई महापालिका म्हणून आमचे लक्ष आहे. आयुक्त इक्बाल सिंह चहल एकंदर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते स्वत: ही परिस्थिती हाताळत आहेत. आज ज्या पद्धतीने लोकांना लॉकडाऊन नको आहे आणि लॉकडाऊन नसलेच पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे. कारण आता कुठे सगळे जण सावरत आहेत आणि पुन्हा जर लॉकडाऊन लागला तर सगळ्यांचे कंबरडे मोडेल. परिणामी आपण प्रत्येकाने जर ठरविले खरेच मला लॉकडाऊन नको. मी गर्दी करणार नाही. मी गर्दीत जाणार नाही. मी मास्क वापरेल. माझ्या घरातील सगळ्यांचे लसीकरण करेन. मी जेथे जेथे जाईन तिथे मास्क काढणार नाही. नियम पाळेन, असा निश्चय आपण केला पाहिजे. कारण एक जण बाधित झाला की त्याचे कुटुंब बाधित होईल. त्यामुळे ही काळजी आपण घेतली पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र येत काळजी घेतली तर लॉकडाऊन होणार नाही. पण २० हजार रुग्णांचा आकडा पार केला तर केंद्राने दिलेल्या नियमानुसार, राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल. त्यामुळे बाजारातील गर्दी, लग्नकार्यातील गर्दी, आकारला जाणारा दंड, यातून होणारे वाद हे सगळे टाळायचे असेल तर आता आपण नियम पाळले पाहिजेत, असेदेखील महापौरांनी स्पष्ट केले.
मी गर्दी करणार नाही. मी मास्क वापरेल. माझ्या घरातील सगळ्यांचे लसीकरण करेन. मी जेथे जेथे जाईन तिथे मास्क काढणार नाही. नियम पाळेन, असा निश्चय आपण केला पाहिजे. कारण एक जण बाधित झाला की त्याचे कुटुंब बाधित होईल. त्यामुळे ही काळजी आपण घेतली पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र येत काळजी घेतली तर लॉकडाऊन होणार नाही.
राज्यात ६६,३०८ रुग्ण उपचाराधीन
nराज्यात दिवसभरात १८,४६६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, २० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याने उपचाराधीन रुग्णही वाढत आहेत. राज्यात ६६ हजार ३०८ रुग्ण उपचाराधीन आहेत.
nराज्यात मंगळवारी ४,५५८ रुग्ण बरे होऊन घरी आले. आतापर्यंत एकूण ६५,१८,९१६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९५,०९,२६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९.६८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
nराज्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,३०,४९४ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ५७३ इतका आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २० मृत्यूंमध्ये मुंबई २, नवी मुंबई १, वसई विरार मनपा १, पनवेल मनपा १, नाशिक १, नाशिक मनपा २, अहमदनगर १, पुणे ५, सोलापूर १, सातारा १, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी १, बीड १, चंद्रपूर मनपा १ समावेश आहे.