...तर सागरी पर्यावरणालाही मिळेल जलसमाधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 06:34 AM2020-02-12T06:34:24+5:302020-02-12T09:53:13+5:30
प्रस्तावित वाढवण बंदरामुळे पर्यावरणप्रेमी धास्तावले
संदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागातला कुठलाही दगड तुम्ही बाजूला केला की त्याखाली हमखास एक सागरी जीव दृष्टीस पडतो. कधी तो पोर्सोलिंग क्रॅब असतो तर कधी बिनकवचाची गोगलगाय. कधी आॅक्टोपस बाहेर झेपावतो तर कधी घोळ माशाचे पिल्लू. समुद्री शेवाळाचे हिरवे गालिचे समोर दिसतात. मऊ आणि कठीण कोरल तसेच सी ओनिमोनीचा तर खच आहे. ही अद्भुत जीवसृष्टी डहाणू तालुक्यातील वाढवणच्या समुद्रकिनारी नांदताना पाहायला मिळते. हे सारे समुद्री वैभव प्रस्तावित बंदरामुळे नामशेष होण्याची
भीती आहे.
वाढवणच्या विस्तीर्ण समुद्रकिनारी तीन किलोमीटरचा खडकाळ भाग आहे. ओहोटी आली की तो खडकाळ भाग आणि त्याभोवतालचे खारफुटीचे दाट जंगल दृष्टीस पडते. त्यांच्या मुळावरील शेकडो प्रकारच्या शेवाळांच्या जाती या माशांच्या पिल्लांचे मुख्य अन्न. हेच खडक आणि खारफुटी मोठ्या माशांपासून छोट्या पिल्लांचे रक्षण करतात. आठ ते दहा प्रकारच्या खेकड्यांच्या जाती इथे पाहायला मिळतात. कवचधारी प्राण्यांमध्ये ग्लास श्रिंप, लॉबस्टर विपुल प्रमाणात आहेत. छोट्या डबक्यांमध्ये घोळ माशांची पिल्लं दिसतात. कायद्याने संरक्षित प्रवाळ खडकांची रांग आणि झू अँथन्स दिसतात. उल्वा, जेलिडियम, काँकोरीअस, अल्गी अशा सहा-सात प्रकारांच्या शेवाळांच्या गालिचामध्ये जिवंत प्रवाळही दिसतात. या समृद्ध अधिवासामुळेच या भागात माशांचे प्रमाण जास्त असल्याचे
मासेमारीसाठी आलेले स्थानिक सांगतात.
निमखाºया पाण्याची कमाल
वैतरणा आणि तापी या दोन नद्या समुद्राला मिळत असल्याने वाढवणच्या समुद्रकिनाºयावरील पाणी हे निमखारे आहे. सर्वोत्तम प्रतीचे पापलेट आणि कोळंबी या भागातच मिळत असल्याने थेट अलिबागच्या मच्छीमार बोटी इथे दाखल होतात. ऐरोली येथील मरिना सेंटरमध्ये मत्स्यबीज निर्मितीसाठी इथलेच पाणी मागवले जाते अशी माहिती या वाढवण बंदराच्या विरोधात सुरुवातीपासून लढा देणाºया नारायण पाटील यांनी दिली.