मुंबई : मुंबईतील खड्डेयुक्त रस्त्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. मुंबईसह राज्यातील रस्त्यांच्या दुर्दशेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी मध्यरात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट मंत्रालयाबाहेरील रस्ता खोदला.दरम्यान, खड्डेयुक्त रस्त्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
आज मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात कार्यालयात अधिकाऱ्यांना रक्तदान केले. याबाबतची माहिती खुद्द राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. ते म्हणाले, भ्रष्ट व्यवस्थेला रक्ताची चटक लागली असेल तर महाराष्ट्रसैनिक रक्त देतील पण निष्पाप नागरिकांना खड्डेयुक्त रस्त्यांनी रक्तबंबाळ करू नका.
दरम्यान, सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात खळ्ळ खट्याक आंदोलन केले.याप्रकरणी पाच मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.आंदोलन करुनदेखील खड्डे बुजवले जात नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याने पक्षाकडून सांगण्यात आले. तसेच, गोरेगावमध्येही खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने महापालिकेच्या पी-दक्षिण विभाग कार्यालयावर संताप मोर्चा काढला होता.