Uddhav Thackeray : मुंबई : प्रमोद महाजन नसते तर शिवसेना आणि भाजपा युती झाली नसती. प्रमोद महाजन असते तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. आज महाविकास आघाडीची सभा बांद्रा येथील बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाचा चांगलाच समाचार घेतला.
चार जूननंतर तुम्ही केवळ मोदीच राहणार आहात, भाडोत्री फौज घेऊन उद्धव ठाकरेला संपवायला आलेत. संपवण्याचा प्रयत्न करा, हा महाराष्ट्र तुमचे राजकारण याच मातीत गडल्याशिवाय राहणार नाही, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईत तुमच्या कंपन्या दादागिऱ्या करतात. मी सर्वच गुजरातींविरोधात नाही. गुजरातीसुद्धा आमचाच आहे. पण मोदींमुळे दोन-पाच मस्तवाल झालेत त्यांना वेळीच सुधरा. मराठी माणसाला प्रवेश दिला नाही तर तुमचे दरवाजे बंद करून तुम्हाला गुजरातला पाठवणार. मराठी, गुजरात, हिंदी, मुस्लमान एकत्र राहतो. त्यात मिठाचा खडा टाकू नका, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
नकली शिवसेना, नकली संतानवरूनही उद्धव ठाकरे यांनी यांनी मोदींचा समाचार घेतला. ते म्हणाले की, तुम्ही तुमचं सांगा आम्ही आमचं सांगू, तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देणारे कोण आहात? अशी विचारणा त्यांनी केला. जेव्हा इथं काही होत तेव्हा मदतीला सर्वात आधी शिवसैनिक धावून जातो, भाजपा कार्यकर्ता जात नाही. बचाव कार्याला जाऊन हिंदू मुसलमान असं बघितलं नाही. तुमचा पक्ष स्वातंत्र्यलढ्यात नव्हता, संयुक्त महाराष्ट्रमध्ये देखील नव्हता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याचबरोबर, कोरोनाच्या वेळेला अजूनही विसरलेले नाही. मी स्वतः अमित शाह आणि नरेंद्र मोदींना फोन करून सांगत होतो, माझ्याकडे उत्तर प्रदेशात राहणारे गावी जाऊ इच्छितात. मी पैसे देतो पण ट्रेन उपलब्ध करून द्या. पण ते नाही म्हणाले. शेवटी काही दिवसांनी सर्वांचा संयमाचा बांध सुटला आणि लोंढेच्या लोंढे निघाले. सात ते आठ लाख लोकांच्या छावण्या उभ्या केल्या. त्यांना जेवण आणि औषधपाणी देत होतो. पण मोदींनी ट्रेन दिली नाही. महाराष्ट्रात एकाही मृतदेहाची विटंबना होऊ दिली नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
अमित शहा म्हणतात, मोदी यांना तिसऱ्या वेळेला पंतप्रधान करायचं. जो कोणी गोंधळ करेल त्याला उलटा टांगून आम्ही सरळ करू. म्हणजे काय? मला कळलं नाही. नेमकं काय करणार आहेत. इकडे तुरुंगात गेलो तरी चालेल पण मोदीसमोर झुकणार नाही असे म्हणणारे अरविंद केजरीवाल आपल्यासोबत आले आहेत. मोदीजी इकडे सगळे मुंबईकर आहेत. हे मुंबईकर जेव्हा संकटात असतात तेव्हा त्यांना मदत करायला घेऊन जातो तो शिवसैनिक जातो भाजपाचा कार्यकर्ता नाही जात कुठे? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
"मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे तरी कुठे?"दहा वर्ष ज्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला, त्यांना कायमचं तडीपार करण्याचा निर्णय मुंबईकरांनी केला पाहिजे. मुंबईमध्ये दोन सभा होत आहेत. एका बाजूला तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री जनता असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, हुकूमशहा याची नजर कशी असते? राक्षसी? अरे! पंतप्रधान म्हणून शेतकरी तुमच्याकडे कांद्याचा हमी भाव मागतोय. कांद्याला भाव मागतोय. निर्यात बंदी मागतोय. त्यांचे न ऐकता तुम्ही भारत माता की जय! भारत माता की जय! म्हणता. मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे तरी कुठे ? कांदा उत्पादक शेतकरी हा सुद्धा भारत माताचा आहे. मणिपूरमध्ये ज्यांचे धिंडवडे काढले गेले त्या महिला सुद्धा भारत माताच आहेत की नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.