मुंबई - महापालिका निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास 9 महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. परंतु आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचं कारण सांगत मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मात्र, शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. भाजपला वाटत असेल तर उद्याच निवडणुका घ्या, आम्हाला काहीच अडचण नाही. निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर यांनी दिली. तसेच, मुंबई महापालिकेच्या निवडणुका जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. मात्र, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे पाहून निर्णय घेतला जाईल. अन्यथा, निवडणुका पुढेही ढकलल्या जातील, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.
आशिष शेलार यांचा आरोप
आशिष शेलार म्हणाले की, "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बहाणा समोर ठेवून आता जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदारनोंदणी करण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे आम्हाला जास्तीचा वेळ लागेल. म्हणजेच 2021 च्या जनगणनेवर नवीन प्रभागरचना करता येऊ शकेल, म्हणून आताच्या महापालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा आणि शिवसेनेचा निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा कुटिल प्रयत्न सुरु आहे
लोकल सेवेचा निर्णय राज्य सरकारच घेईल
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकल सेवेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबईत लोकल ट्रेन नेमक्या कधी सुरू होणार याचं उत्तर महापालिका देऊ शकत नाही. राज्य सरकार त्याचं उत्तर देईल आणि त्यावर निश्चितच विचार केला जात असेल, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. लोकल सुरू झाली की त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. मागील वेळीही तसं झालं होतं. मोठ्या संख्येनं लोक विनामास्क ये-जा करत होते. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यावर झाला होता. त्यामुळं लोकल ट्रेनसाठी आपल्याला आणखी काही दिवस थांबावं लागेल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
मुंबईत सकाळी 7 ते 2 वेळेत दुकानं सुरू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत मुंबईतील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकानं सुरू ठेवण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तर शनिवार, रविवार हे दोन दिवस सर्व दुकानं बंद राहणार आहेत. मात्र, या सगळ्यापेक्षा मुंबईकरांच्यादृष्टीने महत्वाची असलेली लोकल सेवा सर्वांसाठी कधी पासून सुरु, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.