मनीषा म्हात्रे
मुंबई : दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी अन्य पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने वडीलांचा मानसिक छळ सुरु केला. त्यातून होणारा अपमान, खोट्या गुह्यांत अडकविण्याची भिती, बंद झालेली प्रकरणे पुन्हा सुरु करून मागे लावलेल्या चौकशीच्या ससेमिराबाबत खासदार मोहन डेलकर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकड़े केलेल्या तक्रारीत 'जर माझा छळ थांबला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही' अशी भिती वर्तवली असल्याची धक्कादायक माहिती त्यांचा मुलगा अभिनव डेलकर यांच्या जबाबातून समोर आली आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती बाबा वाचले असते असेही त्याने नमूद केले आहे.
अभिनव यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, दादरा-नगर हवेलीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कार्यक्रमांमध्ये शिष्टाचाराप्रमाणे माझे वडील खासदार लोकसभा स्थायी समितीचे सदस्य असताना त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना जाणीवपूर्वक मान दिला नाही. गेल्या वर्षी ऑगस्ट पासून त्यांचा छळ सुरु झाला होता. त्यांना जाणीवपूर्वक भाषण करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. त्यांनी दिलेल्या योग्य व कायदेशीर निर्देशांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले, असे त्यांच्या जबाबात नमूद आहे.
त्यांना न्यायासाठी आत्महत्या करावी लागली १८ डिसेंबर २०२० पासून १४ जानेवारीदरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी व इतर प्रशासन यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, स्थायी समिती अध्यक्ष भूपेंदर यादव, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होत असलेल्या छळाबाबत वाचा फोडली. अशात लोकसभा अध्यक्ष मदत करतील अशी त्यांना आशा होती. त्यांना १८ डिसेंबर २०२० आणि १२ जानेवारी रोजी केलेल्या तक्रात अर्जात छळ थांबला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनीही दखल घेतली नाही. अखेर त्यांना न्यायासाठी आत्महत्या करावी लागली, असे अभिनव यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. त्यांच्या वडिलांचे संबंधित पत्रही पोलिसांकडे देण्यात आले आहे.
मोहन डेलकर यांचे महाविद्यालय बळकाविण्याचा प्रयत्न
२५ कोटीच्या खंडणीची केली होती मागणी
मुंबई : खासदार मोहन डेलकर यांनी सुरु केलेले एस. एस. आर कॉलेज ऑफ फार्मसी अॅण्ड मॅनेजमेन्टवर दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना नियंत्रण हवे होते. यासाठी त्यांना खोट्या गुह्यांत अडकविण्याची धमकी देत २५ कोटीची खंडणीही मागितली असल्याचे अभिनवने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.
डेलकर यांनी सुरु केलेले हे महाविद्यालयाचा बाजारभाव १०० कोटी इतका आहे. गेल्या वर्षभरापासून पटेल हे महाविद्यालयावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांना धमकावत होते. तसेच शारिरिक इजा, खोट्या गुन्हयांमध्ये अटक करून आजन्म कारावासात धाड़ण्याची धमकी देत होते. यात पटेल यांनी २५ कोटी रुपयांची खंडणीही मागितली. ती न दिल्यास ‘पासा’ कायद्यान्वये अटक करण्याची धमकी दिली. महाविद्यालयाच्या ११ पैकी आठ विश्वास्त आपल्या विश्वासातील असावे म्हणून त्यांच्यावर दबाव आणला. अशातच डेलकर यांच्यासाठी काम करणारे इंद्रजीत परमार यांनाही खोट्या गुह्यांत अटक करत कारवाईचा इशारा दिल्याचा आरोप अभिनवने केला आहे. निवडणुकीदरम्यान चुकीचे व्हिडीओ तयार करून व्हायरल करत प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे डेलकर यांच्या तणावात भर पड़ल्याचे अभिनवने सांगितले आहे.