लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सध्या मतदारयादी शुद्धिकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ८ जुलैपर्यंत छायाचित्र सादर न केलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांत पंचनामा केल्यानंतर जवळपास ८० हजार मतदार यादीबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार दोषरहित आणि अचूक यादी तयार करण्यासाठी मतदार यादीत संबंधित मतदाराचे छायाचित्र समाविष्ट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष मध्यवर्ती मतदान कार्यालयात जाऊन त्याची पूर्तता करणे अनिवार्य आहे. अन्यथा नाव वगळण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यात एक लाख १८ हजार, तर उपनगरांत दोन लाख २३ हजार ४२ मतदारांनी अद्याप छायाचित्र दिलेले नाही.
छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत प्रक्रिया पूर्ण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या दरम्यान, मुंबई शहरात जवळपास २० हजार, तर उपनगरांत ६० हजार ४२५ मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पंचनामा केल्यानंतर या मतदारांची नावे यादीतून वगळण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. छायाचित्र न दिलेल्या उर्वरित मतदारांनी ती तातडीने जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
.......
जिल्ह्यातील एकूण मतदार
मुंबई शहर – २५ लाख
मुंबई उपनगर – ७३ लाख २९ हजार १७६
...........
छायाचित्र न दिलेले मतदार
मुंबई शहर – १ लाख १८ हजार
मुंबई उपनगर – २ लाख २३ हजार ४२
.......
पंचनामा किती मतदारांचा झाला
मुंबई शहर – २० हजार
मुंबई उपनगर – ६० हजार ४२५
.............
येथे जमा करा छायाचित्र
- छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी त्यांच्या मतदारसंघ कार्यालयात आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने छायाचित्र अपलोड करता येते.
- शिवाय मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्व मतदारसंघांत असणाऱ्या मध्यवर्ती निवडणूक अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन छायाचित्र जमा करता येईल.
- त्यासाठी अर्ज नमुना क्रमांक ८ सादर करावा लागेल.
............
छायाचित्र जमा करण्यासाठी ८ जुलैची डेडलाईन
मुंबई शहर व जिल्ह्यामध्ये वेळोवेळी छायाचित्रे गोळा करण्याच्या मोहिमा राबवूनही अनेक मतदारसंघांतील मतदारांचे फोटो समाविष्ट झालेले नाहीत. निर्धारित वेळेत छायाचित्र जमा न केल्यास आपण सदर मतदारसंघातून स्थलांतरित झाला आहात अथवा आपण सदर मतदारसंघात राहत नाही, असे गृहीत धरण्यात येऊन आपले नाव मतदारयादीतून वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी. याविषयी काही शंका असल्यास किंवा या संदर्भात आपल्या काही हरकती किंवा आक्षेप असल्यास जवळच्या मतदारसंघ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.
.........
उपनगरांतील सर्व २६ मतदारसंघनिहाय बीएलओची पथके मतदारांच्या घरी जाऊन त्यांना छायाचित्र देण्याचे आवाहन करीत आहेत. विहित मुदतीत मतदारांनी ऑनलाइन वा ऑफलाइन पद्धतीने छायाचित्र सादर करून आम्हाला सहकार्य करावे.
- अजित साखरे, जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर