Join us

...तेव्हा नेहरूंनी घेतली होती ब्रिटिश राजाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ, रणजित सावरकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 8:13 PM

विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांचा सनसनाटी आरोप

मुंबई - विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर देशातील राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही असे म्हणणाऱ्या राहुल गांधींवर आता सावकरांचे नातू रणजित सावरकर यांनी जोरदार टीका केली आहे.देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरूजींनी व्हॉईसराय मंडळाचे सदस्य बनण्यासाठी "भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे) आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती, असा सनसनाटी आरोप रणजित सावरकर  यांनी केला आहे. 

राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना रणजित सावरकर म्हणाले की, ‘’ ही चांगली गोष्ट आहे की, त्यांचे नाव राहुल सावरकर नाही. त्यांचे नाव सावरकर असते, तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते. राहुल गांधी यांनी आजी इंदिरा गांधी यांचे त्यांच्या नावातून "नेहरु" काढल्याबद्दल आभार मानले पाहिजेत. कारण त्यांचे आधीचे नाव इंदिरा गांधी-नेहरू होते. देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरूजींनी व्हॉईसराय मंडळाचे सदस्य बनण्यासाठी "भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे)आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती.स्वा.सावरकरांनी असे घृणास्पद कृत्य करण्याचा स्वप्नातदेखील विचार केला नसता.’’ 

‘’ही गुलामीची शपथ नेहरूजींनी इतक्या निष्ठेने निभावली की,१५ आॅगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावरही ते १९५० पर्यंत किंग जॉर्ज लाच भारताचा सम्राट मानत होते आणि सर्व महत्वपूर्ण निर्णय घेताना त्यांची अनुमती घेत होते. मार्च १९४८ मध्ये जेव्हा राजाजी यांना गव्हर्नर जनरल बनवले. तेव्हाही किंग जॉर्ज यांची अनुमती घेतली होती.’’ असा दावाही रणजित सावरकर यांनी केला. 

टॅग्स :राजकारणविनायक दामोदर सावरकरजवाहरलाल नेहरू