Join us

...तर मनसुखच्या हत्येचा तपासही एनआयए करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 2:42 AM

हिरेन यांच्या मोबाइलच्या सीडीआरची छाननी करून संबधितांना ताब्यात घेऊन त्यांच्या मृत्यूचे गूढ एटीएसला दोन, तीन दिवसांतच उलगडावे लागेल, अन्यथा पहिल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने हा तपासही आम्ही लवकरच ताब्यात घेऊ,

ठळक मुद्देहिरेन यांच्या मोबाइलच्या सीडीआरची छाननी करून संबधितांना ताब्यात घेऊन त्यांच्या मृत्यूचे गूढ एटीएसला दोन, तीन दिवसांतच उलगडावे लागेल, अन्यथा पहिल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने हा तपासही आम्ही लवकरच ताब्यात घेऊ,

जमीर काझी

मुंबई : राज्य व केंद्र सरकारच्या मतभेदाची परिणीती ही उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी सापडलेल्या स्फोटक कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग होण्यात झाली. त्याचप्रमाणे जर दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) ‘त्या’ स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा छडा त्वरित न लावल्यास तोही एनआयए आपल्याकडे वर्ग करून घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिरेन यांच्या मोबाइलच्या सीडीआरची छाननी करून संबधितांना ताब्यात घेऊन त्यांच्या मृत्यूचे गूढ एटीएसला दोन, तीन दिवसांतच उलगडावे लागेल, अन्यथा पहिल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने हा तपासही आम्ही लवकरच ताब्यात घेऊ, असे एनआयएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.अंबानी यांच्या घराच्या परिसरात २५ फेब्रुवारीला सापडलेल्या स्कॉर्पिओमध्ये २५ जिलेटीन कांड्या व धमकीचे पत्र सापडले होते. ती स्काॅर्पिओ विक्रोळी येथून चोरलेली होती. त्याचे मालक मनसुख हिरेन या व्यापाऱ्याकडे मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसचे अधिकारी सातत्याने विचारणा करीत होते. त्यामुळे हिरेन यांच्यावर एकप्रकारचा मानसिक दबाव आला होता. ४ मार्चला तावडे नावाच्या कांदिवलीतील कथित पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी ते दुकानातून गेले ते परत आलेच नाही. त्यानंतर ५ मार्चला त्यांचा मृतदेह मुंब्र्यातील रेतीबंदरमधील खाडीत आढळला. हिरेन यांचा मोबाइल न सापडल्याने तो जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मोबाइल सीडीआरवरून त्यांना दोन दिवसांपासून आलेले सर्वाधिक नंबर आणि अखेरचा फोन कोणाचा आला होता, त्यांनी कोणाशी संभाषण केले होते, याचा उलगडा होणार आहे.

टॅग्स :पोलिसठाणे