मुंबई - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं नेहमीच कौतुक होतं. ओठात आणि पोटात एकच असणारा नेता म्हणजे नितीन गडकरी अशी त्यांनी प्रतिमा आहे. आपल्या बिनधास्त आणि रोखठोक स्वभावामुळे ते सर्वपक्षीय नेत्यांमध्येही आवडते नेते आहेत. तर, केंद्रीय दळणवळणमंत्री म्हणूनही त्यांचा कार्याचा गवगवा असतो. गडकरींच्या कामाचे अनेक किस्से सोशल मीडियावर येत असता. पुणे-मुंबईमहामार्गावर त्यांनी 130 किमी वेगाने गाडी चालवल्याची आठवणही नुकतीच समोर आली आहे.
गडकरींनी काही दिवसांपूर्वी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवरुन चारचाकी गाडीतून काही अंतर प्रवास केला. त्यावेळी, ज्या ठेकेदाराने हा रस्ता उभारला, त्याच ठेकेदाराच्या हाती गाडीचं स्टेअरींग देऊन त्यांनी प्रवास केला होता. त्यामुळे, त्यांचा 1996 च्या काळात युती सरकारमधील किस्साही सध्या चर्चेत आहे. गडकरींनी 1996 ते 99 या कालावधीत युती सरकारमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री होते. त्यावेळी, 1998 मध्ये त्यांनी पुणे-मुंबई एक्सप्रेस वे बांधला, दरम्यान महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह घेतला होता. त्यामध्ये, 130 केएमपीएचच्या वेगाने असलेल्या कारमध्ये त्यांनी चहा पिला. गडकरींनी एका कार्यक्रमात ही गोष्ट सांगितली.
मुंबई-पुणे या महामार्गाचे काम 1998 मध्ये झाले, त्यावेळी महामार्गाच्या एका कामाची पाहणी करण्यासाठी त्यांनी टेस्ट ड्राईव्ह केला होता. त्यावेळी, हिंदूस्तान कंस्ट्रक्शन कंपनीचे मालक अजित गुलाबचंद हेही सोबत होते. जेव्हा गाडी 120-130 च्या स्पीडने असेल, तेव्हाच मी गाडीत चहा पिणार, अन् गाडीत चहाचा थेंब जरी पडला तरी मी एक्शन घेणार, असे गडकरी म्हणाले. दरम्यान, गडकरींनी थर्मासमध्ये टाकून चहा पिला, पण चहाचा एकही थेंब अंगावर पडला नाही. त्यामुळे, ठेकेदाराने तो रस्ता चांगला बांधला असल्याची पोचपावतीच मिळाली. नुकतेच गडकरींनी मुंबई-दिल्ली रस्त्यावर 180 किमी वेगाने गाडीची टेस्ट ड्राईव्ह केली.