मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक बनला आहे. त्यामुळे, आरक्षणाविरोधात कोणी काही बोलल्यास मराठा युवक आक्रमक होत आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी कुणबी आणि मराठा समाज वेगळा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर, मराठा समाजातील अनेकांनी नारायण राणेंच्या विधानाचा सोशल मीडियातून निषेध नोंदवला होता. दरम्यान, आता मराठा समाज आक्रमक झाला असून अने गावात नेते, आमदार, खासदार व मंत्र्यांना बंदी करताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन मराठा समाजाला आवाहन केलं आहे.
समाजाला आरक्षण देणारे, समाजाला आरक्षण भेटावं म्हणून राज्यभर दौरे काढणारे, समाजाच्या कुठल्याही बांधवावर कुठलीही अडचण आली तर त्यांच्यामागे उभे राहणारे, त्यांनाच समाज अडवणार आणि शिव्या देणार असेल.. तेच हात कापणार असेल.. मग यापुढे समाजासाठी उभ राहण्याचा धाडस कोणही करणार नाही, असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन केलं आहे. तसेच, मराठा समाजाकडून आमदार, खासदार, मंत्री आणि नेतेमंडळींना होत असेलल्या विरोधावर आणि सोशल मीडियातून नारायण राणेंवर करण्यात येत असलेल्या टीकेवर त्यांनी परखडपणे भूमिका मांडली. तसेच नितेश राणेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमवेतचा एक जुना फोटोही शेअर केला आहे.
हे दिवस जातील, आरक्षण भेटेलही. पण, केलेली कृती आणि बोललेले शब्द नेहमी स्मरणात राहतात, असेही राणेंनी म्हटले. तसेच, मी मराठा, जय श्री राम असे शब्दही त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लिहिले आहेत. आमदार राणे यांनी काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये मराठा समाजाला यापूर्वी मिळालेल्या आरक्षणात नारायण राणेंचं असलेलं योगदान सांगितलं आहे. तसेच, मराठा समाजासाठी उघडपणे पुढे येऊन लढणारा नेता म्हणजे एकमेव नितेश राणे, असे बॅनर दिसून येतात. तसेच, छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचे खरे श्रेय नारायण राणे यांचेच असल्याचं म्हटलं होतं. त्याचाही दाखला नितेश राणेंनी दिला आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे
मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे, असे मत केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गुरुवारी पत्र परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत असून त्यात नारायण राणेंनी अपशब्द वापरल्याचं सोशल मीडियातून म्हटलं जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लीपबद्दल अधिकृती माहिती कुठेही नाही.