Join us

'...तर मेंटेनन्सची दोन बिले द्या!', सहकार उपनिबंधकांचा सोसायटीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 8:01 PM

Mumbai : कांदिवलीच्या (पश्चिम) आरएनए रॉयल पार्क इमारतीसंदर्भात सहकारी संस्थांच्या आर दक्षिण प्रभागाचे उपनिबंधक डॉ. सुनील कोठावळे यांनी हा आदेश दिला आहे.

मुंबई : बिल्डरने नव्या इमारतीत 2 बीएचके आणि 1 बीएचकेची दोन वेगळी घरे बांधून नंतर ती 3 बीएचके (3 BHK Flat) म्हणून एकत्रित विकली असली तरी प्रत्यक्षात ती दोन वेगवेगळी घरे असल्याचे सहकार उपनिबंधकांनी म्हटले आहे. तसेच, सोसायटीने (Society) या दोन घरांना दोन वेगवेगळी मेंटेनन्सची बिले (Maintenance Bill) द्यावीत, असाही आदेश सुद्धा सहकार उपनिबंधकांनी  दिला आहे.

कांदिवलीच्या (पश्चिम) आरएनए रॉयल पार्क इमारतीसंदर्भात सहकारी संस्थांच्या आर दक्षिण प्रभागाचे उपनिबंधक डॉ. सुनील कोठावळे यांनी हा आदेश दिला आहे. लहान घरे असलेल्या अमिताभ अरोरा व अन्य सदस्यांनी यासंदर्भात उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. यावेळी 3 बीएचकेच्या घरांना सोसायटी एकच मेंटेनन्स बिल देते. प्रत्यक्षात दोन घरे एकत्रित करून 3 बीएचके बांधल्याने त्यांना मेंटेनन्सची दोन बिले दिली पाहिजेत, असे अर्जदारांचे म्हणणे होते, उपनिबंधकांनी ते मान्य केले.

आरएनए रॉयल पार्कमध्ये 3 बीएचके घरे ही प्रत्यक्षात 2 बीएचके आणि 1 बीएचकेची अशी दोन घरे वेगवेगळी बांधून ती नंतर एकत्र केली होती. बिल्डरने त्याची नोंदणीही दोन-दोन वेगवेगळ्या घरांची केली होती. त्यानुसार त्यांची दोन वेगवेगळी नोंदणीकृत खरेदीखते होती. सोसायटीनेही त्या दोन वेगवेगळ्या घरांची दोन वेगवेगळी शेअर सर्टीफिकेट दिली होती.

सोसायटीच्या नोंदणीत त्या दोन घरांचे दोन वेगवेगळे सदस्य दाखवले होते. ते दोघेही जनरल बॉडी मिटिंगला हजर रहात व मतदानही दोघेजण करीत असत. त्या दोनही घरांना दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे, दोन वेगवेगळी स्वयंपाकघरे-न्हाणीघरे-स्वच्छतागृहे होती. त्यामुळे त्या दोनही घरांना स्वतंत्र सेवासुविधा मिळत असल्याने त्यांना दोन मेंटेनन्स बिले द्यावीत, अशी अर्जदारांची मागणी होती. पण, सोसायटीने ती अमान्य केली नाही. त्यामुळे हा वाद सहकार उपनिबंधकांकडे गेला.

दरम्यान, बिल्डरच्या माहिती पुस्तकानुसारही 3 बीएचके म्हणजे प्रत्यक्षात दोन वेगवेगळी घरे होती (त्यांच्यात फक्त मधली भिंत नव्हती). ही बाब घरे घेतेवेळीच सर्वांना ठाऊक होती. सुरुवातीला 3 बीएचके घरे घेणाऱ्यांनीही बिल्डरला वार्षिक सेवाशुल्कही दोन घरांचे वेगवेगळे दिले होते, असे अर्जदारांनी निदर्शनास आणून दिले. तर या घरांचा विजेचा मीटर एकच असून पालिकेचे मालमत्ता कराचे बिलही एकच येते.

तसेच, बिल्डरने त्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी दोन घरांची वेगवेगळी नोंद केली, असे सोसायटीने म्हटले आहे. मात्र उपनिबंधकांनी सोसायटीचा दावा फेटाळला आणि 3 बीएचके हे एकच घर नसून दोन घरे आहेत. त्यामुळे दोन घरांना दोन वेगवेगळी मेंटेनन्सची बिले  द्यावीत, असाही आदेश सहकार उपनिबंधकांनी  दिला आहे.

टॅग्स :मुंबई