Join us

...तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल; शिवसेना नेते संजय राऊत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 4:44 PM

मध्यमवर्गीय लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यापार आणि उद्योगांचे तब्बल ४ लाख कोटींचे नुकसान झाले. लोकांच्या सहन करण्याची एक मर्यादा असते, ते फक्त अपेक्षा आणि आश्वासनावर जिवंत राहू शकत नाहीत

ठळक मुद्देजरी प्रभू रामाचा वनवास संपलेला असेल तरी सध्या कठीण काळ आहेकोणालाही आपल्या आयुष्यात यापूर्वी इतकं असुरक्षित वाटलं नसेल भारतात सुखोई, एमआयजी विमान आणली गेली, पण राफेलसारखा जल्लोष कधी केला नाही

मुंबई – कोरोना व्हायरसमुळे जगभरातील १० कोटी लोकांची कमाई बंद झाली आहे, ४० कोटी कुटुंब कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत, जर लोकांच्या नोकऱ्या जाण्याची समस्येवर तोडगा निघाला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागू शकतो असं मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे, सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी हे विधान केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, मध्यमवर्गीय लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यापार आणि उद्योगांचे तब्बल ४ लाख कोटींचे नुकसान झाले. लोकांच्या सहन करण्याची एक मर्यादा असते, ते फक्त अपेक्षा आणि आश्वासनावर जिवंत राहू शकत नाहीत. जरी प्रभू रामाचा वनवास संपलेला असेल तरी सध्या कठीण काळ आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही माहिती आहे. कोणालाही आपल्या आयुष्यात यापूर्वी इतकं असुरक्षित वाटलं नसेल असं त्यांनी सांगितले.

इस्त्राईलमध्ये पंतप्रधान बेंजामिक नेतन्याहू यांच्याविरोधात प्रदर्शने सुरु आहेत. कोरोना महामारी आणि जागतिक आर्थिक संकटाशी लढण्यास असमर्थ राहिल्याने लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भारतातही हे पाहायला मिळू शकतं असं सांगत राफेलच्या आधी भारतात सुखोई, एमआयजी विमान आणली गेली, पण राफेलसारखा जल्लोष कधी केला नाही, या राफेल विमानामध्ये बेरोजगारी आणि आर्थिक आव्हानाचं संकट संपवण्याची क्षमता आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तसेच भाजपा नेत्या प्रज्ञा ठाकूर म्हणतात हनुमान चालिसा पठन केल्यानं कोविड १९ महामारी संपुष्टात येईल मग हे खरे असले तर हनुमान चालिका पठनाने रोजगार गमावलेल्या १० कोटी लोकांना जगण्यापुरतं तरी काम मिळेल काय? दरम्यान, राजस्थानात गहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सांगतात महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता आणणार पण कोणीही कोरोना संकट, बेरोजगारी यावर चर्चा करत नाही. कोरोना संकटाशी कशाप्रकारे लढायचं आहे हे कोणालाच माहिती नाही असा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.  

टॅग्स :नरेंद्र मोदीशिवसेनासंजय राऊतकोरोना वायरस बातम्याभाजपा