Join us  

...तर जनता सरकारला रस्त्यावर आणेल

By admin | Published: March 11, 2017 2:31 AM

प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई सुरू आहे. भूमिपुत्रांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरविला जात आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई सुरू आहे. भूमिपुत्रांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरविला जात आहे. एपीएमसीसह सर्व व्यापाऱ्यांची अडवणूक सुरू आहे. प्रत्येक घटकावर अन्याय सुरू असून सरकारने सर्वसामान्य जनतेला उद्ध्वस्त करण्याचे धोरण थांबविले नाही तर आता जनता रस्त्यावर उतरली आहे. भविष्यात सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी दिला आहे. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त, एपीएमसी व इतर व्यापारी, माथाडी कामगार, फेरीवाले, झोपडपट्टीधारकांसह सर्वच घटकांवर सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली सीबीडीमध्ये निर्धार मोर्चाचे आयोजन केले होते. सिडको, महापालिका, एमआयडीसी व राज्य शासनाकडून होणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी दिघा ते बेलापूरपर्यंतचे हजारो नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. किल्ले गावठाण क्रोमा चौकापासून अर्बन हाटपर्यंत मोर्चा काढण्यात आला. नाईकांनी सरकारच्या धोरणांवर टीकेचा भडीमार केला. भाजपा सरकारच्या काळात संपूर्ण राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. नवी मुंबईमधील सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करण्याचे आश्वासन देऊन दुसरीकडे घरांवर बुलडोजर फिरविला जात आहे. फक्त आश्वासनांवर बोळवण केली जात आहे. गरीब झोपडपट्टीवासीयांच्या डोक्यावरील छप्पर हिरावून घेतले जात आहे. सरकार २०१५पर्यंतची घरे नियमित करण्याचे आश्वासन देत आहे; पण प्रत्यक्षात दुसरीकडे सरसकट घरांवर कारवाई सुरू आहे. सरकार फसवणूक करत असल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सरकार विरोधातील राज्यातील पहिला सर्वात मोठा मोर्चा नवी मुंबईकरांनी काढला आहे. निर्धार मोर्चा हा सरकारला इशारा देण्यासाठी असून सर्वसामान्यांवर अन्याय थांबविला नाही तर हीच जनता सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.सरकार कायद्याची भीती दाखवून सर्वसामान्यांवर कारवाई करत आहे. प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी वेळ पडल्यास कायद्यामध्ये बदल केला पाहिजे. गरिबांसाठी कायद्यात बदल करा अन्यथा, जनता स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, महापौर सुधाकर सोनावणे, काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, अपर्णा गवते यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. आ. संदीप नाईक, महापालिकेतील सभागृहनेते जयवंत सुतार, रमाकांत म्हात्रे, सागर नाईक, एपीएमसीमधील व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे, शंकर पिंगळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ही लढाई सोपी नाहीये. लोकांसाठी सरकार असावे, त्यात राजकारण होता कामा नये. महापालिकेचे आयुक्त हे राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्यासाठी आलेले आहेत. एकीकडे मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी करायची नाही. तर दुसरीकडे पाणी गळू नये म्हणून इमारतीच्या छतावर बांधलेले पत्र्याचे शेड अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई केली जात आहे. - शशिकांत शिंदे, आमदार व माथाडी नेते सरकारचे धोरण नक्की काय आहे हे कळत नाहीये. बांधकामे अधिकृत की अनधिकृत हे नंतर ठरवा, अगोदर कारवाया थांबवा. आयुक्तांना खऱ्या अर्थाने लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील, तर त्यांनी झोपड्या, एपीएमसी मार्केट या ठिकाणी जावे. गरिबांना उद्ध्वस्त करण्यापेक्षा त्यांना आधार देणे आवश्यक असून, अन्यायाविरोधातील लढ्यात कामगार सदैव पुढे राहतील. - नरेंद्र पाटील, माथाडी नेते बैलगाडीच्या शर्यतीचा अध्यादेश रातोरात निघतो. मात्र, माणसांसाठी शासन अद्याप कसलाही विचार करत नाहीये. एका याचिकेमुळे दिघावासीय अनधिकृत ठरले आहेत. लोकं झोपडीत का राहतात, याचा सरकारने तरी विचार करायला हवा होता.- अपर्णा गवते, नगरसेविका राष्ट्रवादी एवढी वर्षे काँगे्रस व राष्ट्रवादीची राज्यात सत्ता होती. तेव्हा कधी कोणावर कारवाया झाल्या नाहीत. नोटाबंदीमुळे अनेक व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. अखेर हे परिवर्तव लोकांच्या घरापर्यंत पोहोचल्यामुळे हा निर्धार मोर्चा काढावा लागत आहे. - दशरथ भगत, जिल्हाध्यक्ष, काँगे्रस महापालिका बदनाम करण्यासाठी आयुक्त आले आहेत. नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव आणूनही ते तिथेच आहेत. नागरिकांना रोटी, कपडा व मकान पुरवण्याची शासनाची जबाबदारी आहे; परंतु शासन घरे देत नाही आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांना बेघर करत आहे. - सुधाकर सोनावणे, महापौर फेरीवाला, एपीएमसी, झोपडपट्टी सर्वच ठिकाणी कारवाया सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात हे घडले नव्हते. परीक्षेचा काळ असल्यामुळे झोपड्यांवर कारवाईला मुदतवाढ मिळणे आवश्यक होते. - अनंत सुतार, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीभाजपा सरकाच्या काळात प्रत्येक घटक त्रस्त झाला. कायद्याच्या नावाखाली प्रकल्पग्रस्त, झोपडपट्टीधारक, माथाडी कामगार, फेरीवाले, एपीएमसीतील व्यापारी सर्वांनाच उद्ध्वस्त केले जात आहे. सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करण्यापेक्षा त्यांच्यासाठी कायद्यात बदल करा, अन्यथा भविष्यात ही जनता सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. - गणेश नाईक, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते