- संदीप शिंदे
मुंबई : रेमडेसिवीर आणि टोसिलीझूमॅब या दोन औषधांव्यतिरिक्त कोरोनावर मात करणे शक्य नाही, असे वातावरण गेल्या काही दिवसांत निर्माण झाले आहे. त्यातून या औषधांचा सर्रास आणि अनियंत्रित वापर सुरू झाला आहे. पुरवठा आणि मागणी यांच्यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने औषधांचा काळाबाजारही तेजीत आहे. परंतु, ही औषधे ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार (नियमावली) वापरली गेली नाही तर त्यांच्या दुष्परिणामाचाच धोका जास्त आहे. त्यामुळेच या औषधांचा सध्या सुरू असलेला अनियंत्रित वापर चिंता वाढविणारा असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाइकांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच झाली आहे.गंभीर आणि अतिगंभीर अवस्थेतल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पाचव्या ते दहाव्या दिवसांतच रेमडेसिवीर हे अॅण्टी व्हायरल इंजेक्शन दिल्यास ते उपयुक्त ठरते असे निष्पन्न झाले आहे. त्यापूर्वी किंवा त्यानंतरच्या दिवसांमध्ये या औषधाचा कोणताही सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. तसेच, या औषधामुळे रुग्णाचा जीव वाचल्याचे आजवर कुठेही सिद्ध झालेले नाही. व्हायरल लोड मात्र निश्चित कमी होतो आणि उपचारांसाठी तो साहाय्यभूत ठरतो. परंतु, जर हे औषध योग्य पद्धतीने दिले नाही तर याचे दुष्परिणामही खूप आहेत. यकृत आणि मूत्रपिंडावर त्याचे विपरीत परिणाम होतात, अशी माहिती कोविड नियंत्रणासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य आणि फोर्टिस हॉस्पिटलच्या इन्टेन्सिव केअर युनिटचे प्रमुख डॉ. राहुल पंडित यांनी दिली.टोसिलीझूमॅब हे सायटोकीन स्टॉर्म (विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर निर्माण होणारी तीव्र प्रतिकारशक्ती) सुरू होत असताना दिले तरच ते प्रभावी ठरते. परंतु, त्याचा एकच डोस देणे आवश्यक आहे. अपवादात्मक परिस्थितीत दुसरा डोस देता येतो, परंतु या औषधामुळे रुग्णाच्या रोग प्रतिकारशक्तीत लक्षणीय घट होते. त्यातून फंगल किंवा बॅक्टेरीयल यांसारखे सेकंडरी इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्या औषधाचा वापरही अत्यंत काळजीपूर्वक करणे क्रमप्राप्त असून सध्या सुरू असलेला त्यांचा अंदाधुंद वापर ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही दोन्ही औषधे केवळ त्यांच्या प्रोटोकॉलनुसारच नाही तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्यायला हवी. तसेच, या औषधांचे संभाव्य दुष्परिणाम टाळण्यासाठी रुग्णांच्या प्रकृतीतल्या चढ-उतारांवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे असते. तशी व्यवस्था असलेल्या ठिकाणीच या औषधांचा वापर व्हायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.आयसीएमआर आणि एम्सचेही निर्देशया औषधांचा योग्य वापर झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम होण्याचीच शक्यता जास्त असल्याचे मत इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च आणि आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सने व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांचा वापर निर्धारित प्रोटोकॉलनुसारच व्हावा, असे निर्देश त्यांनी नुकत्याच झालेल्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये राज्यातील आरोग्य यंत्रणांना दिले आहेत. तसेच, कोविड नियंत्रणासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सनेसुद्धा राज्य सरकारला तशी शिफारस केली असून त्या दिशेने हालचाली सुरू असल्याची माहिती टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली.