मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे संभाजीराजे भोसले यांनी सोमवारपासून महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. टाऊन हॉल परिसरातील नर्सरी गार्डनमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळास अभिवादन करुन दे राज्याच्या दौऱ्यावर निघालेय. सोलापूरमधील दौऱ्यात मराठा समाज बांधवांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. त्यावेळी, उद्या खासदारकीचाराजीनामा द्यायची माझी तयारी असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.
मी खासदारकीचाराजीनामा दिल्यानं जर समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर मी उद्याच खासदारकीचा राजीनामा देतो. समाजाचं म्हणणं असेल तर मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. तसेच, खासदार असल्यामुळे आपण अनेकदा सरकारवर दबाव टाकून कामे मार्गी लावू शकल, असेही त्यांनी सांगितले.
रायगड प्राधिकरणाचा विषयही खासदार असल्यामुळेच मार्गी लागला. तसेच, दिल्लीत सर्वात मोठी शिवजयंती आपणच साजरी केली, त्यावेळीही मी खासदार असल्याने राष्ट्रपतींपासून ते अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी, मी दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र आजही राष्ट्रपती भवनात लावल्याचे दिसत आहे. संसदेतही शाहू महाराजांची जयंती मी साजरी केली. त्यामुळे, खासदार असल्याने सोबत राहून आपली कामे करुन घेता येतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
28 मे रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाही फोन आला होता. आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी भेटण्यासाठी त्यांनी विनंती केली. पण मी राज्याच्या दौऱ्यावर असल्याचे सांगितले. त्यांच्याशी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी 27 किंवा 28 मे रोजी बैठक होईल. त्यानंतर आरक्षणप्रश्नी पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
विदर्भ खान्देशातही दौरा
न्यायालयाच्या चौकटीतून आरक्षण देता येते की नाही, येत नसेल तर इतर मार्गातून समाजाला काय देणार हे स्पष्ट केले पाहिजे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच पक्षातील आमदार, खासदारांनी पुढाकार घेतला पाहिजे. मराठा आरक्षणप्रश्नांतून मार्ग काढण्यासाठी माझाही अभ्यास झाला आहे. राज्यभर फिरून विविध तज्ज्ञांची मते जाणून घेत आहे. विदर्भ, खानदेश आणि मराष्ट्राच्या विविध जिल्ह्याला भेटून समाजाच्या प्रुमख नेत्यांना भेटत आहे, असेही ते म्हणाले.