Join us

... तर शिवसेना-मनसे एकत्र येणार; शिंदे गटाच्या आमदाराचा असाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 2:20 PM

राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात आणि पत्रकार परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडाचं समर्थन केलं होतं.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातील ही दुसरी भेट आहे. यापूर्वी २ डिसेंबरला हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात आले. त्यातच, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना-मनसे एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात, असा दावाच संजय शिरसाट यांनी केला आहे. 

राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात आणि पत्रकार परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडाचं समर्थन केलं होतं. तर, शिवसेना उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत गेल्यावरुन टोलाही लगावला होता. आता, शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि मनसे एकत्र येईल, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.  

राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी ‘वर्षा’वर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी राज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज ठाकरे यांच्यासोबत  मनसेचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुकाने आणि आस्थापनावरील मराठी भाषेतील पाट्या, टोलनाके, धारावी झोपडपट्टी  पुनर्विकास आदी मुद्यांसह सद्य राजकीय  परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते. मनसेने  स्वतंत्र किंवा महायुतीसोबत निवडणूक लढवली तर लोकसभेचे गणित कसे असेल, याचा अभ्यास महायुतीकडून केला जात आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम आहे. मात्र, संजय शिरसाट यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

''राज  ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास हा राजकरणातील  मोठा बॉम्बस्फोट असेल. सध्याच्या घडीला ते एकत्र येण्याची कोणतीची चिन्ह नाहीत. राज ठाकरे सोबत आले तर काही गैर नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि  फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या काही चर्चा नाही. निवडणुकीत प्रत्येकाला प्रत्येकाची आवश्यकता भासते. त्यामुळे राज ठाकरे सोबत आले तर आनंद आहे, असे म्हणत संजय शिरसाट यांनी शिवसेना-मनसे एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. ६ जानेवारीपासून महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांत ते भेटी देऊन जाहीर सभा घेणार आहेत. त्यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आणि उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी असल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेनाएकनाथ शिंदे