Join us

...तर औषधांचा पुरवठा रोखू; पुरवठादारांचा आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2023 12:37 PM

पालिकेच्या निर्णयामुळे रुग्णालयांसह दवाखान्यात औषधांचा तुटवडा होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहर आणि उपनगरात एकीकडे कोरोना, इन्फ्लुएंझाची साथ वाढत असतानाच दुसरीकडे महापालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीतीदायक स्थिती उद्भवली आहे. औषध पुरवठादारांकडून औषधे घेऊन बिले  थेट कंपन्यांना अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करत मुंबईतील सुमारे ४०० औषध पुरवठादारांनी औषधांचा पुरवठा थांबविण्याचा इशारा दिला आहे.

कोरोना आणि इन्फ्ल्युएंझामुळे सध्या सर्वच महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. महापालिका रुग्णालयांना ४०० पुरवठादांराकडून औषधांसह सर्जिकल साहित्य पुरविण्यात येते. त्यानंतर पुरवठादार कंपनीची बिले  महापालिकेला देऊन मिळालेले पैसे कंपन्यांना देतात, अशी प्रक्रिया होती. परंतु आता पुरवठादारांना असा व्यवहार थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तुम्ही केवळ औषधे पुरवा त्याचे पैसे थेट कंपन्यांना देऊ, असे त्यांना कळवण्यात आले आहे.   

पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत वा अत्यंत अल्पदरात औषधे आणि शस्त्रक्रियांचे साहित्य उपलब्ध होते. शिवाय, रुग्णालयांप्रमाणेच ‘आपला दवाखाना’तील औषधेही याच पुरवठादारांमार्फत पुरविली जातात. त्यामुळे या पुरवठादारांनी औषध पुरवठा खंडित केल्यास रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याखेरीज, शस्त्रक्रियांचे नियोजनही ढासळण्याची शक्यता आहे.

याविषयी ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले, महापालिकेच्या निर्णयाला सर्व पुरवठादारांचा विरोध आहे, त्याबाबत पालिका प्रशासनाशी संवाद सुरू असून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र पालिकेने सकारात्मकता न दाखविल्यास याचे परिणाम रुग्णांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे पुरवठादारांची भूमिकाही प्रशासनाने लक्षात घ्यायला हवी.

रुग्णालयांसह दवाखान्यात होणार औषधांचा तुटवडा

औषध पुरवठादार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास केईएम, नायर, सायन, कूपर रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालये, १०७ आपला दवाखाना, २८ प्रसूतिगृह, ७६ आरोग्य केंद्र इ. ठिकाणी औषधांचा तुटवडा निर्माण होणार आहे.

....तर औषधांसह या साहित्याचा तुटवडाताप-सर्दीवरील औषधे, वैद्यकीय साहित्य, सुई, हातमोजे यांच्यासह आयव्ही सेट, सलाईन बॉटल, कॅथेटर, पॅरासिटामाॅल, ॲप्रन, इंट्राकॅथ या सर्जिकल साहित्यासह नोराड्रेनायलिन, ॲड्रेनालिन, एव्हिल, ऍमोक्झोसिलिन, न्युओस्टीगमाईन, ग्लायकोपायरोलेट, ॲट्राक्युरिन, वेक्यूरोनिअम, केटॅमिन, टीटी इंजेक्शन, बेटॅडिन सोल्युशन, ट्रॉपिकली प्लस, ॲपिडाईन ड्रॉप, जीवनरक्षक डेक्सा, ऍट्रोफिल, डायक्नो, रॅनटॅक, पॅरिनार्म, कॅल्शियम ग्लुकोनो लस, डेरिफायलीन, ऐमिरोफायलीन या जीवनावश्यक औषधांचा तुटवडा भासणार आहे.

 

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका