Join us  

...तर तेव्हाच ठाकरेंचे सरकार पडले असते! अनिल देशमुखांचा आरोप; भाजपचेही प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 6:28 AM

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार, पार्थ पवार अशा नेत्यांवर खोटे आरोप करणारी प्रतिज्ञापत्रे लिहून द्या नाहीतर जेलमध्ये जायला तयार राहा, असा दबाव देवेंद्र फडणवीस यांनी टाकला होता, या आरोपाचा देशमुख यांनी पुनरुच्चार केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजपत या नाहीतर जेलमध्ये जा, असा दबाव माझ्यावर टाकला. एकनाथ शिंदे यांच्या आधी आपल्यावर हा पहिला प्रयोग झाला. माझ्यावरचा प्रयोग यशस्वी झाला असता, तर तेव्हाच उद्धव ठाकरेंचे सरकार पडले असते, असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा सोमवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपनेही त्यांच्या आरोपांवर पलटवार करीत ‘तीन वर्षे देशमुख झोपले होते का,’ असा सवाल केला. सरकारी योजनांना प्रसिद्धी मिळू नये, म्हणून देशमुख खोट्या बातम्या पसरवत असल्याची टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. अनिल देशमुख अडीच वर्षांनंतर संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यांनी गृहमंत्री असतानाच दबाव आणणाऱ्यांवर कारवाई का केली नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार,  पार्थ पवार अशा नेत्यांवर खोटे आरोप करणारी प्रतिज्ञापत्रे लिहून द्या नाहीतर जेलमध्ये जायला तयार राहा, असा दबाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर टाकला होता, या आरोपाचा देशमुख यांनी पुनरुच्चार केला. फडणवीसांनी दिलेल्या ऑफरला आपण नकार दिल्यामुळेच ईडी-सीबीआयची कारवाई आपल्यावर झाली, जेलमध्ये जावे लागले. फडणवीसांनी आपल्याकडे पाठविलेली प्रतिज्ञापत्रे मी करून दिली असती तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना खोट्या आरोपांखाली तुरुंगात टाकले असते. असेही ते म्हणाले.

मागितलेले पुरावे का देत नाहीत? - चित्रा वाघ

फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येते. यात कसला पराक्रम..? महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखी कोणासोबत असेल..? अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे. आम्ही मागितलेले पुरावे का देत नाहीत? त्यानंतरच्या तीन तासांत तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ‘एक्स’वर निशाणा साधला.  

विश्वासार्हता नसल्याने मिळाला जामीन; सलील देशमुख यांची माहिती 

अनिल देशमुख यांना वैद्यकीय कारणावरून जामीन मिळाला, असा विरोधकांचा आरोप बिनबुडाचा असून, प्रकरणात विश्वासार्हता नसल्यामुळे त्यांना जामीन मिळाला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते सलील देशमुख यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत दिली.

 

टॅग्स :अनिल देशमुख