...तर राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार, कोर्टाने सक्त ताकिद देत घातल्या या कठोर अटी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:21 PM2022-05-04T12:21:37+5:302022-05-04T12:23:36+5:30
Ravi Rana & Navneet Rana News: जवळपास १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र हा जामीन मंजूर करताना कोर्टाने राणा दाम्पत्याला सक्त ताकिद देत कठोर अटीं घातल्या आहेत. त्यांचं पालन न झाल्यास त्यांना देण्यात आलेला जामीन रद्द होऊ शकतो.
मुंबई - मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, जवळपास १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र हा जामीन मंजूर करताना कोर्टाने राणा दाम्पत्याला सक्त ताकिद देत कठोर अटीं घातल्या आहेत. त्यांचं पालन न झाल्यास त्यांना देण्यात आलेला जामीन रद्द होऊ शकतो.
राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी प्रसारमाध्यमांना कोर्टाने घातलेल्या अटींची माहिती दिली. ते म्हणाले की, राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटी घातल्या आहेत, त्यांचे राणा दाम्पत्याला पालन करावे लागणार आहे. राणा दाम्पत्याला चौकशीमध्ये सहकार्य करावे लागेल. तसेच पोलिसांना राणा दाम्पत्याला चौकशीसाठी बोलवायचं असेल तर २४ तास आधी नोटिस द्यावी लागेल. राणा दाम्पत्याला पुराव्यांसोबत कुठलीही छेडछाड करता येणार नाही. तसेच चौकशी सुरू असलेल्या कुठल्याही मुद्द्याबाबत त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कुठलेही प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारू नयेत, असेही राणा यांच्या वकिलांनी सांगितले.
Court has granted bail to Navneet Rana&Ravi Rana. Some conditions have been imposed. They've been asked to cooperate in the investigation & interrogation. Police have also been directed to issue an advance notice of 24 hours to them: Rizwan Merchant, advocate of Navneet-Ravi Rana pic.twitter.com/K7TOqkVQBf
— ANI (@ANI) May 4, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणू, असा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून त्यांची त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यातच राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान, जामिनासाठी प्रयत्नशील असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीर अर्जावर सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले होते. मात्र न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या जामिनावरील निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या तुरुंगातील मुक्कामात वाढ झाली होती. मात्र अखेर आज कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.