...तर मुंबई शहराचा महापौर भाजपचा झाला असता : शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:55 AM2023-07-17T11:55:36+5:302023-07-17T11:56:22+5:30
मी बाळासाहेबांच्याच विचारांवर चालताे आहे, ही माझी चूक का?
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले असते, तर गेल्यावेळी मुंबईचा महापौर भाजपचा असता. परंतु मी शब्द टाकला, तुम्ही मुंबई सोडा. केवळ माझ्या शब्दाखातर त्यांनी शिवसेनेला हे पद दिले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मुख्यमंत्री शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
मी मुख्यमंत्री बनायला गेलो नव्हतो. परंतु माझे धाडस बघून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला मुख्यमंत्री करायचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत मला मुख्यमंत्रिपदाचा बहुमान प्रदान केला. आता अजित पवार आपल्याकडे आले आहेत. त्यामुळे आपली ताकद वाढल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वर्षभरात लोकहिताचे तीनशे ते चारशे निर्णय घेतले. हे निर्णय लोकापर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. तुमच्या हक्काचा माणूस आता मुख्यमंत्री आहे.
तुमचे प्रत्येक प्रश्न सोडविले जातील. ठाणेप्रमाणे क्लस्टरच्या माध्यमातून नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास केला जाईल. सिडकोनिर्मित्त जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे. उर्वरित सर्व प्रश्न संयुक्त बैठकीच्या माध्यमातून सोडविले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
या प्रसंगी मंचावर उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना पक्षप्रवक्ते नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विजय चौगुले उपस्थित होते. मुख्यमंत्री सहायता निधीतून गेल्या वर्षभरात ८६ कोटी रुपयांचे वाटप केल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी या वेळी स्पष्ट केले. विजय नाहटा व विजय चौगुले यांचीही यावेळी भाषणे झाली.
मुख्यमंत्र्यांचा सवाल
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अन्याय सहन करू नका, असे नेहमीच सांगितले. त्यानुसारच मी निर्णय घेतला. बाळासाहेबांच्या विचारांवर मी चालतोय, ही माझी चूक आहे का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी या वेळी उपस्थित केला.