मुंबई - केंद्रातील भाजप सरकारच्या हुकूमशाही स्वरूपाच्या वटहुकुमाला विरोधी पक्षांनी एकजूट होऊन संसदेत पराभूत करावे म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्यानिमित्ताने केजरीवाल आज शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी आले होते. यावेळी, केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मोदी सरकार लोकशाही आणि सर्वोच्च न्यायालयालाही मानत नाही. आम्ही करू तेच, अशा अविर्भावात, गर्वाने वागत असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही मातोश्रीवर आले होते. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ते भेटणार आहेत. तत्पूर्वी आज, मातोश्रीवर जाऊन मोदी सरकार अहंकारी असल्याचं त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे म्हणाले ते नातं जपणारे आहेत, तर आम्हीही नातं टिकवणारे आहोत. आम्हाला त्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानलं, आम्हीही त्यांच्यासमवेतची ही दोस्ती शेवटपर्यंत कायम ठेवू, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी शिवसेना आणि आप एकमेकांचे मित्र असल्याचे म्हटले. केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध विरोधक एकत्र येत आहेत. त्याच भूमिकेतून केजरीवाल यांनी आज मुंबईत जाऊन मोदी सरकारने दिल्ली सरकारविरुद्ध वटहुकूम काढत हुकूमशाही केल्याचं म्हटलं. तसेच, राज्यसभेत या अध्यादेशासंदर्भातील विधेयक मांडलं जाईल, तेव्हा शिवसेना याचा विरोध करेल, तसेच आम्हाला समर्थन करेल, असे वचन उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिले, असेही केजरीवाल यांनी म्हटले. जर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं नाही, तर २०२४ मध्ये देशात मोदी सरकार येणार नाही, असे भाकीतही केजरीवाल यांनी केले.
सर्वोच्च न्यायालायाने निवडून आलेल्या दिल्ली सरकारला सर्व अधिकार दिले होते. मात्र, केंद्र सरकारने नवीन अध्यादेश काढत दिल्ली सरकारचे सर्व अधिकार हे राज्यपालांना दिले आहेत. म्हणजे, आम्ही लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला, म्हणजेच लोकशाहीलाही मानत नाही आणि सर्वोच्च न्यायालयालाही मानत नाही, अशीच भूमिका मोदी सरकारची असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं. तसेच, अहंकारी आणि स्वार्थी लोकं देश चालवू शकत नाहीत. ते स्वार्थाने सरकार चालवत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी मोदी सरकावर केला.
दरम्यान, इलेक्टेड ऐवजी सिलेक्टेड लोकांकडून सरकार चालवलं जात आहे. आमदार आणि मुख्यमंत्री लोकांमधून निवडून येतात. पण, राज्यपाल हे सिलेक्ट केले जातात, त्यांच्याकडून सरकार चालवण्यात येत आहे. त्यांना सर्वाधिकार देण्यात येत आहे, असे म्हणत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्रातील मोदी सरकावर टीका केली.