... तर पोलिस तत्काळ बडतर्फ होतील, गृहमंत्र्यांचा विधानसभेतून इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 07:54 AM2023-07-19T07:54:03+5:302023-07-19T07:54:28+5:30
केमिस्ट दुकानात सीसीटीव्ही बंधनकारक : उपमुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थांच्या विक्रीत सहाय्य करताना कोणी पोलिस आढळल्यास त्याला सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचसोबत केमिस्ट दुकानांत सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
रोहित पवार तसेच इतरांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. अमली पदार्थात सध्या कॅथा इड्युलिस खतची भर पडल्याचे पवार म्हणाले. तर जितेंद्र आव्हाड यांनी कफसिरप तसेच इतर गोळ्यादेखील अमली पदार्थ म्हणून वापरात असल्याचा मुद्दा मांडला.
कायद्यात सुचविले हे बदल
nएनडीपीएस हा केंद्राचा कायदा १९८५ सालचा आहे. त्यात तीन बदल सुचविण्यात आले आहेत. मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी कंट्रोल डिलिव्हरी म्हणजे पूर्ण व्यवहार होईपर्यंत अटक न करणे, चार्जशीट दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत वाढवून १८० दिवस करणे. तसेच अमली पदार्थाची कमर्शियल क्वान्टिटी कमी करणे.
nउदाहरणार्थ, गांजाची कमर्शियल क्वान्टिटी २० किलो आहे. एखाद्याकडे १९ किलो गांजा सापडला तर तो स्वत:च्या वापराकरता ठेवल्याचे सांगून कमी शिक्षेत सुटका होते, असे फडणवीस म्हणाले.
कुठून येते कॅथा इड्युलिस खत?
कॅथा इड्युलिस खत हे येमेनमधून येते. ती वनस्पती आहे. त्याची पावडर आणून विकली जाते. आपण सीमा सुरक्षा वाढविल्यानंतर हे ड्रग कंटेनर कार्गोच्या माध्यमातून पाठविले जाते. या कंटेनरसाठीचे विशेष स्कॅनर घेतले आहेत. प्रत्येक कंटेनर हा या स्कॅनरमधून न्यावा लागतो, असे फडणवीस यांनी सांगितले.