... तर सासऱ्याविरुद्ध जावई सामना रंगणार, रावसाहेब दानवेंच्या जालन्यात बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:17 PM2021-06-17T20:17:41+5:302021-06-17T20:19:45+5:30
जालना लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत.
मुंबई - केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील मतभेद हे सर्वांना परिचीत आहेत. त्यातूनच, आता हर्षवर्धन जाधव यांनी थेट सासऱ्यांविरोधातच दंड थोपटले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये रावसाहेब दानवेंविरोधात उमेदवार म्हणून उभा राहण्याची तयारी जाधव यांनी दर्शवली आहे.
जालनालोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. फलक लावल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातील लोकांची इच्छा असेल तर, पंचवीस वर्ष सुरू असलेलं दानवाच्या राज्याचं रूपांतर रामराज्यात आपण करू असा आशय लिहिण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केली होती. मात्र, या पोस्टरबाजीमुळे ते पुन्हा राजकीय पटलवार आपला डाव टाकणार आहेत का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जालना लोकसभा मतदारसंघात त्यांच्याच लावलेल्या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षांपासून रावसाहेब दानवे हे निर्विवाद निवडून येत आहेत. रावसाहेब दानवे हे हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आहेत. मात्र, त्यांच्याच मतदारसंघात काही लोकांनी हर्षवर्धन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत.
विशेष म्हणजे या फलकावर हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रीण इशा झा यांचादेखील फोटो लावलाय. त्यामुळे ही बाब निश्चित रावसाहेब दानवे यांना खटकणारी आहे. याबाबत हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्टीकरण देताना निवडणुकीची तयारी दर्शवली आहे. ''गेल्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघात दानवेंचं राज्य आहे आणि या राज्याचे रूपांतर रामराज्यात करण्यासाठी आपण या मतदारसंघातून लोकांची इच्छा असेल तर निवडणूक लढवायला तयार आहोत'', असे जाधव यांनी म्हटले. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यात कौटुंबिक वाद आहे. यापूर्वीही अनेकदा पोलीस तक्रार आणि व्हिडिओच्या माध्यमांमातून हा वाद जनतेसमोर आला आहे. त्यामुळे, आता हा वाद निवडणुकांच्या रिंगणातही पाहायला मिळेल, असेच दिसून येत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकांसाठी अद्याप मोठा अवधी आहे. त्यामुळे, तोपर्यंत दानवे आणि जाधव यांच्यातील चुरस अशीच राहील, की वाद संपुष्टात येईल, हे काळच ठरवेल.