मुंबई - पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये महिलेसोबत दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले हेच असल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी तो नाना पटोले यांना टॅग केला आहे. तसेच काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात? असा खोचक प्रश्न विचारला होता. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, चाकणकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
भाजपच्या श्रीकांत देशमुख यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचाही एका महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हॉटेलमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. ओक्केमधी हे गाणंही या व्हिडिओला लावण्यात आल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, अद्याप कुठलीही तक्रार आली नसल्याचं म्हटलं आहे.
सध्या सर्वत्र गाजत असलेला नाना पटोले यांच्या व्हिडिओच्या विषयी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, आमच्याकडे कुठल्याही महिलेने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात कुठलीही तक्रार दाखल केली नाही. जर ती केली असती तर नक्की आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असती, असेही चाकणकर यांनी म्हटले.
नाना पटोले यांनीही मांडली आपली बाजू
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रकरणी बोलताना नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली. मला बदनाम करण्याचं कारस्थान असून याबाबत व्हिडिओची तपासणी करुन आमच्याकडून कायदेशीर बाजू मांडण्यात येईल. ''मी सध्या पूराच्या दौऱ्यामध्ये आहे, पण राजकारणाची पातळी जी खाली उतरलीय त्याचा हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात आमची लीगल टीम कार्यवाही करणार आहे,'' असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. तसेच, चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलताना मला त्या ताईंबद्दल काहीही बोलायचं नाही, संजय राठोडांबाबत त्यांनी काय केलं. आमच्या प्रकरणात काय घडलंय ते आमची लीगल टीम पाहातेय, उद्या ते सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ कुणाचा, तसेच तो कुणी व्हायरल केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच लोकमतही या व्हिडीओच्या विश्वासार्हतेची कुठलीही पुष्टी करत नाही.