मुंबई - मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होत आहे. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपावरुन भाजपा आमदार व मंत्री आक्रमक झाले असून काही जरांगेंना अटक करण्याची, तसेच आंदोलनाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यावरुन, विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आक्रमक भाषण केले. तसेच, या घटनेचे राजकारण होता कामा नये. कुणी कुणाची आई-बहिण काढणार असेल मग विरोधी पक्ष असो वा सत्ताधारी सभागृहाने आढेवेढे न घेता भूमिका घ्यायला हवी. कुणाबद्दलही हे असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस ताकदीने उभा राहील, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना साद घातली.
मराठा समाजाने जे मोर्चे काढले ते शांततेनेच काढले होते. पण, यावेळी बीडमध्ये काय घडलं? आपलं राजकारण कुठल्या स्तराला चाललं आहे? आज आपण समाजाला विघटित करण्याचा आणि समाजाचे तुकडे पाडून राजकारण सुरू आहे. कुणासोबत फोटो दिसतायेत, कोण पैसा पुरवतंय, ही प्रत्येक गोष्ट आता बाहेर येते, कुठेही लपत नाही. कुणी कुणाची आयबहिण काढणार असेल मग विरोधी पक्ष असो वा सत्ताधारी सभागृहाने आडेवेढे न घेता भूमिका घ्यायला हवी. कुणाबद्दलही हे घडलं तरी देवेंद्र फडणवीस ताकदीने उभा राहील, असे म्हणत विरोधकांनाही फडणवीसांना या घटनेचं राजकारण न करण्याचं आवाहन केलं.
मला मनोज जरांगे पाटील यांच्याशी देणेघेणं नाही. परंतु त्यांच्यामागील बोलविता धनी कोण हे शोधले पाहिजे. कुणी वॉर रूम उघडल्या, कुठं कुठं उघडल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणी उघडली, नवी मुंबईत कुणी उघडली, सगळी माहिती समोर आलीय. त्याची SIT चौकशी होईल. सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढले जाईल, असा आक्रमक पवित्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात घेतल्याचं दिसून आलं.
म्हणून मराठा समाज माझ्या पाठिशी
मनोज जरांगे या विषयावर माझी बोलण्याची इच्छा नव्हती. पण, सभागृहात हा विषय आला म्हणून बोलावे लागतंय. मराठा समाजाला मी आरक्षण दिले, ते आरक्षण हायकोर्टात टिकवलं, जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोवर सुप्रीम कोर्टातही टिकवले. एवढेच नाही तर सारथीसारखी संस्था सुरू करणे, विद्यार्थ्यांना फी सवलत देणे, वसतीगृह मिळत नाही तोवर विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देणे असेल. वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना असेल या माझ्या काळात सुरू झाल्या. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत या योजना अधिक मजबूत आणि सुदृढ केल्या. त्यामुळे मराठा समाजाच्या बाबतीत मला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, जे काही केलंय, ते मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे काही बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठिशी उभा आहे. त्यांच्या पाठिशी उभा राहिला नाही असं त्यांनी सांगितले.