मुंबई - शिवसेनेची ओळख असलेल्या दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, दसरा मेळाव्यावरून य़ुवासेना आक्रमक झाली असून, शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास मैदान फावड्याने उखडून टाकू, असा इशारा युवासेनेने दिला आहे.
युवासेनेचे पदाधिकारी शरद कोळी यांनी दसरा मेळाव्यावरून आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंशिवाय कुणाचाही मेळावा शिवाजी पार्कवर होऊ देणार नाही. शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतल्यास शिवाजी पार्कचं मैदान फावड्यानं उखडून टाकू, असा इशारा युवासेनेचे पदाधिकारी शरद कोळी यांनी दिला आहे.
शरद कोळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाकिस्तान सामन्यावेळी आदेश देऊन ज्याप्रमाणे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून टाकली होती. त्याप्रमाणे जर या ४० आमदारांच्या गटाने मेळावा घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ उखडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कोळी यांनी दिला आहे.