Join us

... तेव्हा प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करू; नाना पटोलेंनी सांगितली काँग्रेसची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 4:18 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे.

मुंबई - काँग्रेससह विरोधकांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला अद्यापही स्थान मिळालेलं नाही. त्यावरुन, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली आहे. तर, सुजात आंबेडकर यांनीही इंडिया आघाडी विचित्र का वागत आहे, असे म्हणत आघाडीला लक्ष्य केलं होतं. यासंदर्भात पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तसेच, प्रकाश आंबेडकरांनी पाठवलेल्या पत्रावरही भाष्य केलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस 'इंडिया' आघाडीचा भाग आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीला या आघाडीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे, त्यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. तर, सुजात आंबेडकर यांनी इंडिया आघाडी विचित्रपणे का वागतेय, असा सवालही केला होता. आता, याप्रकरणी काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे.  आपला जो काही प्रस्ताव असेल तो त्यांनी द्यावा. मीडियासमोर चर्चा करुन काही होत नसतं. प्रकाश आंबेडकर हे महान नेते आहेत, त्यांच्याबद्दल वायफळ चर्चा काँग्रेस करणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, काँग्रेसची लगाम ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्याच हातात आहे, ती इतर कुणाच्याही हाती नसते. एकीकडे देश वाचवण्यासाठी मला इंडिया आघाडीत घ्या, असं ते म्हणतात. पण, दुसरीकडे काँग्रेसवर असे आरोप करत देश खाईत टाकायचं काम चाललंय का, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटलं. काँग्रेसने इतकी वर्षे देशाचं संविधान सांभाळलं, लोकशाही सांभाळली. आज देशाचं संविधानचं संपत चाललं आहे. त्यामुळे, असे फालतूचे आरोप करण्यात काहीही अर्थ नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला. 

तेव्हा चर्चा करू - पटोले

वचिंत आघाडीने यापूर्वी राष्ट्रीय नेत्यांकडे जे पत्र दिलं होतं, त्यातही ठामपणे कुठलीही भूमिका मांडलेली नाही. कुठलाही प्रस्ताव त्या पत्रातून नाहीये, सगळ मोघम चाललेलं आहे. दुसरीकडे त्यांनी ४८ उमेदवारांची घोषणाही केलीय. त्यामुळे, त्यांच्या मनात नेमकं काय आहे, हे आम्हालाही माहिती नाही. जेव्हा ते आमच्याकडे प्रस्ताव घेऊन येतील, चर्चा करतील तेव्हा आम्हीही चर्चा करू, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. 

लोकसभेच्या ४८ जागा लढवणार- आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले की, त्यांचा पक्ष २०२४ च्या निवडणुकीत सर्व ४८ लोकसभेच्या जागा लढवेल. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवू. लोकसभा निवडणुकीची तयारी पक्षाने सुरू केली असून, मी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. 

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेवंचित बहुजन आघाडी