Join us  

...मग राज ठाकरे अन् जयदेव ठाकरेंची 'शिवसेना' का नाही?; संजय शिरसाट स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 10:21 AM

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय काल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला.

मुंबई-

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय काल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. आयोगानं दिलेला निर्णय मान्य नसल्याचं सांगत काल उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला धनुष्यबाण आजही आमच्या देवाऱ्यात असल्याचं म्हटलं. तसंच देशात लोकशाही शिल्लक नसल्याचाही घणाघात केला. शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना या दाव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. 

"ठाकरे म्हणजे शिवसेना नाही. खुद्द बाळासाहेबांनी असं कधीच म्हटलं नाही. ते नेहमी म्हणायचे शिवसेना माझी नाही. शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे. शिवसेना काही खासगी मालमत्ता नाही. आता समज असा निर्माण केला गेला आहे की ठाकरे म्हणजे शिवसेना. पण तसं जर असेल तर मग राज ठाकरेंची शिवसेना का नाही? जयदेव ठाकरेंची शिवसेना का नाही? तेही ठाकरेच आहेत ना?", असा सवाल उपस्थित करत संजय शिरसाट यांनी टीका केली. ते 'एपीबी माझा' या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. 

शिरसाटांनी 'मविआ'तील कारभाराचा पाढाच वाचलाशिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय कसे चुकीचे आणि अन्यायकारक होते याचा पाढाच वाचला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार त्यावेळी स्थापन झालं असलं तरी शिवसेनाला सत्तेत काहीच स्थान नव्हतं. राष्ट्रवादीच सरकार चालवत होतं. मग अशा सत्तेतलं मुख्यमंत्रीपद काय कामाचं? अशानं तुम्ही पक्ष वाढवणार होतात का? बरं आम्ही हे सांगितलं नाही असंही नाही. वारंवार उद्धव ठाकरेंच्या कानावर हे सांगत आलो होतो. पण पुढे काही घडतच नव्हतं, असंही संजय शिरसाट म्हणाले.

टॅग्स :संजय शिरसाटराज ठाकरे