Join us

... मग आमचं सरकार का पाडलं? उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 4:03 PM

उद्धव ठाकरे यांनी सरकारी नोकर भरतीच्या खासगीकरणाला कडाडून विरोध केला

मुंबई - राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून शेतकरी मोर्चा आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप ह्या दोन्ही मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आज संपावर तोडगा काढण्याची मागणी केली. तर, विधानसभा आवारात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत, कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संप सुरूय, पण हे सरकार दिल्लीश्वरांची मर्जी राखण्यात व्यस्त असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. तसेच, राज्य सरकारने कंत्राटी आऊट सोर्सिंगचा निर्णय घेतल्यावरुनही उद्धव ठाकरेंनी सरकारला जाब विचारला.

उद्धव ठाकरे यांनी सरकारी नोकर भरतीच्या खासगीकरणाला कडाडून विरोध केला. आऊटसोर्सिंग संदर्भातील निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी हा महाविकास आघाडीच्या काळातील निर्णय होता, असे म्हटल्याचा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर, जर आमचे निर्णय तुम्हाला योग्य वाटत होते, योग्य वाटतात. मग, आमचं सरकार पाडलंच का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. देवेंद्र फडणवीस काहीही सांगतात, जर असेल तर ते योग्य की अयोग्य, असा सवालही त्यांनी केला. 

शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे निघाला आहे. याआधीच्या मोर्चाला शिवसेनेचे नेते समोर गेले होते. बळीराजा आक्रोश करत असताना सरकारला त्यांच्यासाठी वेळ नाही. शेतकऱ्यांशी बोलून राज्य सरकारने त्यांचे प्रश्न सोडवायला हवे, सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला हवे. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. मुंबईतील व्यवसाय आणि कार्यालय हे दुसऱ्या राज्यात जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला

जुन्या पेन्शन योजनेला समर्थन

जुनी पेन्शन योजना लागू करायला हवी, आमचा त्यासाठी पाठिंबा आहे, केंद्राची शक्ती पाठीमागे असताना योजनेला काय समस्या आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर अडवाणींच्या काळात ही योजना रद्द करण्यात आली असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंचामृत योजनेचा अर्थ हा हे सरकार कुणाला पोटभर मिळणार नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाशेतकरीनिवृत्ती वेतनदेवेंद्र फडणवीस