लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईतील अनेक महिलांनी भाग घेतला. त्याबदल्यात त्यांना सश्रम करावासाची शिक्षाही भोगावी लागली. स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटच्या टप्प्यात सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाल्यावर आंदोलनाचे नेतृत्व करण्यास कोणीही उरले नव्हते, अशा वेळी मुंबईतील विद्यार्थिनी आणि महिलांनी ही चळवळ जिवंत ठेवली, अशा शब्दांत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रोहिणी गवाणकर यांनी आठवणींना उजाळा दिला.
पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे आयोजित ‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईचे योगदान’ या विषयावरील वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मादाम कामा यांनी जर्मनीत भारताचा पहिला राष्ट्रध्वज फडकवत संपूर्ण देशाला राष्ट्रध्वज फडकावण्याची प्रेरणा दिली. दादाभाई नौरोजी यांची नात पेरिन कॅप्टन आणि त्यांच्या दोन भगिनींनी मुंबईत दारोदारी जाऊन खादीचा प्रचार आणि विक्री करीत ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले. उषाबेन मेहता यांनी मुंबईत मांजर सेना सुरू केली होती. या सेनेकडे ब्रिटिश पोलिस आणि सैन्याला त्रास देण्याची, त्यांना हैराण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
‘माझ्या एक भावाला तुरुंगवास आणि मृत्युदंडाची शिक्षा भोगावी लागली होती. दुसऱ्या भावाने पत्री (प्रति) सरकार आंदोलनात भाग घेतला होता. त्यावेळी मी १४ वर्षांची होते. पत्री सरकारच्या आंदोलनात मी गुप्त निरोप पोचवण्याचेही काम केले होते,’ अशी आठवणही त्यांनी सांगितली.
................
आंदोलनांची साक्षीदार
१७५७ ते १८५७ या शतकात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात ३०० हून अधिक छोटे-मोठे उठाव झाले. ब्रिटिशांच्या विभाजनवादी आणि अन्याय्य धोरणांना प्रतिकार करण्यासाठी देशभरात अनेक संघटना स्थापन झाल्या. त्यापैकी एक बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. १८८५ साली तिची स्थापना करण्यात आली. मुंबई भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू होते आणि दक्षिण मुंबईत ब्रिटिशांच्या धोरणांविरोधात अनेक आंदोलने झाली, अशी माहिती इतिहास अभ्यासक अनुराधा रानडे यांनी दिली.
..............
‘चले जाव’चा नारा
१९४२ च्या लढ्यातील घटनांनी मुंबईचे बहुरंगी, बहुसांस्कृतिक एकजिनसी स्वरूप सर्वांना दिसले. व्यापक राजकीय मोर्चाची सुरुवात ऑगस्ट क्रांती मैदानापासूनच झाली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींनी येथून ‘चले जाव’चा नारा दिला. अरुणा आसफअली आणि उषा मेहता यांनी महिलांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली. या लढ्याचे केंद्र मुंबईच राहिली. पुढे हा लढा इतर प्रांतात पसरला, असे अभ्यासक अरुणा पेंडसे यांनी सांगितले.