मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून निश्चित करण्यात आलेल्या ‘फेरीवाला क्षेत्रा’च्या आडून शिवसेना गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी केला. पालिकेने निश्चित केलेल्या फेरीवाला क्षेत्रामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, स्वाभिमान पक्षाचे नारायण राणे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या घरांच्या आसपासच्या परिसराचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’चा मात्र यात समावेश नाही. आमच्या घरासमोर फेरीवाले बसवले तर मातोश्रीबाहेर फेरीवाले कसे उभे करायचे, ते आम्हालाही माहिती आहे, अशा शब्दांत नितेश यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला.मनसेनेही पालिकेच्या फेरीवाला क्षेत्राला विरोध दर्शविला आहे. दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळील एम. बी. राऊत मार्ग आणि केळुसकर मार्ग येथे ‘फेरीवाला क्षेत्र’ निश्चित केले आहे. तेथे अनुक्रमे १० आणि २० फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित होती. याविरोधात मनसेच्या पदाधिकाºयांनी स्वत:च्या विभागात पालिकेने निश्चित केलेल्या ‘फेरीवाला क्षेत्रा’च्या आसपासच्या परिसरात जनजागृती मोहीम सुरू केली असून नागरिकांकडून सूचना, हरकती गोळा करून त्या पालिका प्रशासनाच्या हवाली करण्यात येणार आहेत.
‘...तर ‘मातोश्री’बाहेर फेरीवाले बसवू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 4:34 AM