मुंबई : येथे लसीकरणासाठी ३३५ केंद्र उपलब्ध आहेत. त्यांची दिवसाला ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. एक कोटी डोस उपलब्ध झाल्यावर प्रत्येक विभागात दोन यानुसार ४५४ लसीकरण केंद्र सुरू करण्यात येतील. त्यामुळे दिवसाला एक लाख डोस देणे शक्य होईल, असा दावा मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे.
मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणारी महापालिका आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजीदेखील अव्याहतपणे घेत असते. याच दृष्टीने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विविध ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही संख्या वाढविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना व गरजूंना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी साहाय्य करावे, म्हणून वेगवेगळ्या अशासकीय संस्था, व्यक्ती यांना महापालिका प्रशासनाच्या वतीने यापूर्वीही आवाहन करण्यात आले आहे. पुन्हा आवाहन करण्यात येत आहे. ज्या-ज्या वेळी लससाठा उपलब्ध होऊन लसीकरण पूर्ववत सुरू करण्यात येते, त्याची माहिती सामाजिक माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. लससाठा उपलब्ध झाल्यानंतर, लसीकरणासाठी नागरिकांनी केंद्रांवर रांगेत उभे राहून गर्दी करू नये. गर्दी केल्याने संसर्ग फैलावण्याचा धोका वाढतो, ही बाब सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण केंद्रांवर येताना आणि वावरताना एकावर एक असे दोन मास्क परिधान करावेत.
कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेतलेल्या नागरिकांनी देखील चिंताग्रस्त होऊ नये. प्रथम मात्रा घेतल्यानंतर शरीरात पुरेशी प्रतिपिंडे (ॲण्टिबॉडीज) निर्माण होतात. त्यामुळे काही कारणाने दुसरी मात्रा घेण्यास थोडासा विलंब झाला तरी काळजी करू नये. कोविड प्रतिबंध लससाठ्याच्या उपलब्धतेसंदर्भातील वस्तुस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून मुंबईकरांना आवाहन करण्यात येते की, प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे.