Join us

'... तेव्हा कळेल', संजय राऊतांच्या टिकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा असाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:10 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते.

मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने अचानक माघार घेतल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठे बळ मिळाले. भाजपाच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतली असली तरी लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात असल्याने ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होईल. आता. भाजपच्या माघारीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिकेलाही प्रत्युत्तर दिलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. त्यानंतर सोमवारी भाजपाने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची परंपरा कायम राखण्याचं काम भाजपाने केलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र, पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिकेसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावरही, त्यांनी एका वाक्यात पलटवार केला. “मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही जवळच आली आहे, तेव्हा कोण हरतो आणि कोण जिंकतो ते कळेल.”

काय म्हणाले होते संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊतांना हजर करण्यात आले होते. तेव्हा, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “भाजपाला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता. तर, शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होती. भाजपाने या मतदारसंघात सर्वे केला होता. पराभवाची चाहूल लागल्यामुळेच भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला,” असे राऊत यांनी म्हटलं होते. राऊतांच्या या टिकेला मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं आहे.  

निवडणूक होणारच, बिनविरोध नाही

सोमवारी १७ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवारांपैकी एका उमेदवारास आपले मत देऊन नागरिकांना आपला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपाएकनाथ जाधव