मुंबई/बीड - भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत असतात. भाजपकडून पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याचं विधान विरोधकांकडून सातत्याने होत असतं. त्यावरुन, पंकजा यांनीही अनेकदा आपली नाराजी उघड केली आहे, पण पक्षाच्या निर्णयाचं त्यांनी नेहमी स्वागतच केलं आहे. देवेंद्र फडणवीसांकडून त्यांना डावललं जात असल्याचा आरोप फडणवीस यांच्यावर केला जातोय. कारण, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं पंकजा यांनी यापूर्वी म्हटलं होतं, त्या विधानाची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात आणि भाजपात होती. आता, पंकजा यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना, तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का?, असे म्हटलयं.
पंकजा मुंडेंचा मतदारसंघ असलेल्या परळी येथे जल जीवन मिशन योनजेच्या कामाचे भूमिपूजन पकंजा मुंडेंच्याहस्ते करण्यात आले. यावेळी, उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा यांनी कार्यकर्त्यांनी नेत्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिला हवं, असे म्हटलं. हे म्हणताना त्यांनी, देशाची पंतप्रधान एक स्त्री होती, पण तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का? असे विधान केले. पंकजा मुंडेंच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत असून अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.
माणसांसाठी काम करणे हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. त्या संस्कारावर चालणारी तुमची ताई आहे. ताईमध्ये काही खोट असेल तर सांगा, असेही पंकजा यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, यापूर्वी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे म्हटल्याने पंकजा यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातूनच पंकजा यांना पक्षातून दूर ठेवण्यात येत असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. त्यातच, आता पंकजा यांनी थेट पंतप्रधानपदी भाष्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.