अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 07:42 AM2024-10-27T07:42:58+5:302024-10-27T07:43:42+5:30
या श्वानांच्या गळ्यात ‘पेट मी’ अशी अनोखी पाटी असणार आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या येत असल्याने अनेक विमानांना मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे. परिणामी प्रवाशांनाही ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांचा हा ताण कमी करण्यासाठी एका खासगी कंपनीतर्फे विमानतळ परिसरात पाळीव श्वान फिरविण्यात येणार असून, प्रवाशांना त्यांच्याशी खेळता येणार आहे. या श्वानांच्या गळ्यात ‘पेट मी’ अशी अनोखी पाटी असणार आहे.
पॉफेक्ट लाइन कॅनल संस्थेच्या निहारिका सेखरी यांनी हा उपक्रम विमानतळ प्रशासनाला सादर केला असून, प्रशासनानेही त्याला मान्यता दिली आहे. या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली आहे. निहारिका यांनी लोकमतला सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-२ मधील डिपार्टचर विभागात सध्या १० श्वान ठेवण्यात आले आहेत. यामध्ये गोल्डन रिट्रीव्हर, मॉल्टी, शित्झु, देशी जातीचे श्वान यांचा समावेश आहे. निहारिका यांनी अमेरिकेच्या नॅश अकादमीमधून डॉग थेरपी या विषयात उच्च शिक्षण घेतले आहेत.
विमानतळ परिसरात पाळीव श्वान फिरविण्यात येणार असून, प्रवाशांना त्यांच्याशी खेळता येणार आहे. काही विशिष्ट जातींच्या श्वानांना याकरिता त्यांनी उत्तमरीत्या प्रशिक्षित केले आहे. जेणेकरून हे श्वान आनंद निर्माण करू शकतात, असा त्यांचा दावा आहे. यापूर्वी देखील अन्य संस्थेच्या माध्यमातून डॉग थेरपीचा उपक्रम मुंबई विमानतळावर राबविण्यात येत होता. मात्र, कोविड काळामध्ये हा उपक्रम थांबविण्यात आला होता.
दरम्यान, अमेरिका आणि तुर्कस्थानातील विमानतळांवर अशा प्रकारे प्रवाशांचा ताण हलका करण्यासाठी डॉग थेरपी उपक्रम राबविण्यात येतो आणि तो लोकप्रिय आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाविषयी उत्सुकता लागलेली आहे. पॉफेक्ट लाइन कॅनल संस्थेच्या निहारिका सेखरी यांनी डॉग थेरपी हा वेगळा उपक्रम विमानतळ प्रशासनाला सादर केला. प्रशासनाने त्याला मान्यता दिली आहे.