एअर इंडियाच्या लसीकरण केंद्रांतही लसटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:06 AM2021-05-15T04:06:53+5:302021-05-15T04:06:53+5:30
मुंबई : अत्यावश्यक सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनाही लसटंचाईचा सामना करावा लागत आहे. या कर्मचाऱ्यांच्या जलद लसीकरणासाठी ...
मुंबई : अत्यावश्यक सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनाही लसटंचाईचा सामना करावा लागत आहे. या कर्मचाऱ्यांच्या जलद लसीकरणासाठी उभारलेल्या केंद्रात लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने काही केंद्रांवरील सेवा तात्पुरती स्थगित करावी लागली आहे.
देश-विदेशातील हजारो प्रवाशांच्या थेट संपर्कात येत असल्याने वैमानिक, केबिन क्रू आणि एअर इंडियाच्या अखत्यारीतील सर्व कर्मचाऱ्यांचे तत्काळ लसीकरण करा, अन्यथा काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर ३१ मेपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची ग्वाही एअर इंडियाने दिली होती. जलद लसीकरणासाठी सर्व मोठ्या विमानतळांवर लसीकरण केंद्रे उभारण्यात आली. परंतु, लसटंचाईमुळे काही केंद्रांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ११ आणि १३ मे रोजी दिल्ली विमानतळावरील केंद्र बंद ठेवण्यात आले. तर उर्वरित विमानतळांवर कूर्मगतीने लसीकरण सुरू असल्याची माहिती एअर इंडियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. परिणामी ३१ मेपूर्वी लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य हुकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई विमानतळावरील बहुतांश कंत्राटी कर्मचारी, खासगी सुरक्षारक्षक, ग्राउंड स्टाफ लसीकरणापासून वंचित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दररोज हजारो प्रवाशांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. एकीकडे खाटा आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने सर्वसामान्यांचे हकनाक बळी जात आहेत. या गरीब कर्मचाऱ्यांवर असा प्रसंग ओढावल्यास त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होतील. त्यामुळे त्यांचे तत्काळ लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.