शहरामध्ये १६८ प्रकारचे पक्षी, २२० जलचर प्रजाती

By Admin | Published: April 17, 2016 01:07 AM2016-04-17T01:07:57+5:302016-04-17T01:07:57+5:30

महापालिका क्षेत्रामध्ये १६८ प्रकारचे पक्षी व २२० प्रकारचे जलचर व इतर प्राणी आहेत. तब्बल ८०० प्रकारची फुलझाडे असल्याचा दावा पर्यावरण अहवालामध्ये केला आहे. परंतु प्रत्यक्षात पक्षी, प्राणी, फुलपाखरांची

There are 168 kinds of birds, 220 species of water in the city | शहरामध्ये १६८ प्रकारचे पक्षी, २२० जलचर प्रजाती

शहरामध्ये १६८ प्रकारचे पक्षी, २२० जलचर प्रजाती

googlenewsNext

- प्राची सोनावणे,  नवी मुंबई
महापालिका क्षेत्रामध्ये १६८ प्रकारचे पक्षी व २२० प्रकारचे जलचर व इतर प्राणी आहेत. तब्बल ८०० प्रकारची फुलझाडे असल्याचा दावा पर्यावरण अहवालामध्ये केला आहे. परंतु प्रत्यक्षात पक्षी, प्राणी, फुलपाखरांची नावे व इतर तपशीलच पालिकेकडे उपलब्ध नसल्याने ही माहिती खरी आहे का, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दिवा ते दिवाळेपर्यंत २२ किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा नवी मुंबईला लाभला आहे. याशिवाय २४ तलाव, ११ होल्डिंग पाँड, १३२ विहिरी आहेत. जवळपास ५० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर खारफुटीचे जंगल वसले आहे. १०८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळामधील ५६ टक्केच बांधकामासाठी उपलब्ध आहे. २४ टक्के जंगल व १२ टक्के ओलिताखालील जमीन आहे. दिघा ते बेलापूरपर्यंत डोंगररांग आहे. निसर्गाचे वरदान लाभल्यामुळे शहरामध्ये विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, फुलपाखरे, मासे आढळून येत असतात. देशातील फ्लेमिंगोंच्या प्रमुख आश्रयस्थानामध्येही वाशी ते बेलापूर खाडीचा समावेश होतो. टी. एस. चाणक्य व एनआरआय कॉम्प्लेक्सच्या बाजूचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, हा शहराचा बहुमानच आहे. महापालिकेने २०१४ - १५ च्या पर्यावरण अहवालामध्ये शहरातील जैवविविधतेविषयी माहिती दिली आहे. शहरात १६८ प्रकारचे पक्षी, ८० प्रकारचे सरपटणारे प्राणी, १४० प्रकारची फुलपाखरे, १२५ प्रकारचे मासे व तब्बल ८०० प्रकारची फुलझाडे आहेत. महापालिकेने शहरात २०० उद्याने तयार केली असून पामबीच, ठाणे-बेलापूर रोडवर वनराई फुलवली आहे. यामुळे विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी असल्याचा दावा केला आहे.
पर्यावरण अहवालामध्ये महापालिकेने केलेला दावा थक्क करणारा आहे. अहवालामध्ये १६८ प्रकारचे पक्षी असल्याचा उल्लेख आहे. परंतु फ्लेमिंगो वगळता एकाही पक्षाचे नाव दिलेले नाही. नक्की कोणते पक्षी आहेत, ते कधी, कुठे आढळतात याची काहीच माहिती नाही. १४० प्रकारची फुलपाखरे शहरात आहेत. नक्की कोणती फु लपाखरे कुठे आढळतात, त्याचे काही सर्वेक्षण झाले आहे का याचीही काहीच माहिती दिलेली नाही. तोच प्रकार मासे व फुलझाडांच्या बाबतीत आहे. शहरामध्ये २०११ मध्ये जैवविविधतेची पाहणी केल्याचे अहवालामध्ये नमूद केले आहे. परंतु प्रत्यक्षात पालिका प्रशासनाने कधीच पक्षी, प्राणी व इतर जैवविविधतेचा तपशील दिलेला नाही. अहवालामधील आकडे कशाच्या आधारावर आहेत, याविषयी विचारणा केली असता टेरी संस्थेने अभ्यास करून ही माहिती दिली असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात टेरीनेही कोणतेच सर्वेक्षण केलेले नसून, मुंबईतील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, समुद्र, कर्नाळा अभयारण्यात आढळणारे पक्षी व प्राणी येथेही आढळत असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. यामुळे समृद्ध जैवविविधतेच्या आकड्यांविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

पालिकेचा दावा आधारहीन
महापालिका प्रशासनाने पर्यावरण अहवालामध्ये जैवविविधतेची आकडेवारी दिली आहे. परंतु प्रत्यक्षात कोणते पक्षी, प्राणी, मासे, फुलपाखरे, फुलझाडे आढळतात त्यांची नावेच नाहीत. अहवालामध्ये दिलेली आकडेवारी कशाच्या आधारावर आहे, त्याचाही उल्लेख नाही. वास्तविक मुंबई संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व कर्नाळा अभयारण्य व इतर परिसरात आढळणारे पक्षी येथेही आढळतात. हा अंदाज बांधून आकडे दिले असून हा दावाच आधारहीन आहे.

पालिकेचा दावा...
शहरामध्ये २९२ प्रकारचे वृक्ष, २९५ किटकांच्या प्रजाती, १५ अपृष्ठवंशीय प्रजाती, १६८ पक्ष्यांच्या प्रजाती, ८० सरपटणारे प्राणी, १४० प्रकारची फुलपाखरे, १२५ प्रकारचे मत्स्यजीव व ८०० प्रकारची फुलझाडे आढळून येत असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु हे पक्षी, प्राणी, फुलपाखरे यांची नावे व इतर काहीच तपशील दिलेला नाही. महापालिकेच्या पर्यावरण विभागातही याविषयी माहिती उपलब्ध नाही.

शहरातील निसर्गस्थळे
द बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने शहरातील उत्तम निसर्ग असलेली स्थळे निश्चित केली आहेत. यामध्ये २१० हेक्टरचा आर्टिस्ट व्हिलेज परिसर, ५० हेक्टर परिसरात पसरलेला व्हॅली पार्क, २१० हेक्टरचे खारघर हिल, ५० हेक्टरची पारसीक टेकडी, १४२० हेक्टरचा खारघर प्लेटयू व भारती विद्यापीठाच्या मागील बाजूच्या २५ हेक्टर जमिनीचा समावेश आहे.

Web Title: There are 168 kinds of birds, 220 species of water in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.